‘यु.के.’मध्ये आर्थिक आणीबाणी, भारतीय विद्यार्थी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 08:00 AM2022-12-18T08:00:00+5:302022-12-18T08:00:02+5:30

Nagpur News जगभरातील अनेक देश सध्या महागाई आणि आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Financial emergency in UK, Indian students in crisis | ‘यु.के.’मध्ये आर्थिक आणीबाणी, भारतीय विद्यार्थी संकटात

‘यु.के.’मध्ये आर्थिक आणीबाणी, भारतीय विद्यार्थी संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्वाह भत्ता वाढविण्याची मागणीउच्च शिक्षण घेणारे शेकडाे विद्यार्थी अडचणीत

निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील अनेक देश सध्या महागाई आणि आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. युनायटेड किंगडम (यु.के.)मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या याच अवस्थेतून जावे लागत आहे. या देशात सध्या आर्थिक आणीबाणीची स्थिती असून महागाईने स्थानिक नागरिकांची दैनावस्था झाली आहे. यात भारतीय विद्यार्थीही हाेरपळले जात आहेत.

यु.के.मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी लाेकमतशी बाेलताना वाईट परिस्थितीबाबत जाणीव करून दिली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राज्य व केंद्र शासनाकडून शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता दिला जाताे. युकेमध्ये आर्थिक संकट (काॅस्ट ऑफ लिव्हिंग क्राइसेस) निर्माण झाले आहे. प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा स्थितीत या देशात शासनाच्या शिष्यवृत्तीने शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे व दुसऱ्या बाजूला आर्थिक संकट झेलणे, यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची गळचेपी झालेली आहे.

१२ वर्षांपासून निर्वाह भत्ता तेवढाच, महागाई उंचावर

महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती याेजनेअंतर्गत यु.के.मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ९९०० पाउंड म्हणजेच ८२५ पाउंड दरमाह निर्वाह भत्ता दिला जातो. या रकमेत विद्यार्थ्यांना घरभाडे, जेवण, प्रवासखर्च, शिक्षणखर्च करावा लागताे. यात १०-१२ वर्षापासून वाढ झाली नाही. दुसरीकडे महागाई दरवर्षी वाढत आहे. सध्या लंडनमध्ये घरभाडे ९०० ते १००० पाउंड किंवा जवळपास १ लाख रुपयांपर्यंत आहे. लंडनच्या बाहेर ८०० ते ९०० पाउंड आहे. या तुटपुंज्या रकमेत भाेजन व इतर खर्च कुठून करावा, असा निर्वाणीचा प्रश्न विद्यार्थ्यांसमाेर असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कुणी वेटर, कुणी पंपावर

राज्य शासनातर्फे गेल्या दशकभरापासून या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांना तिथे पेट्राेल पंप किंवा हॉटेलमध्ये वेटर किंवा इतर क्षुल्लक काम करून दैनंदिन गरजांची पूर्तता स्वतः करावी लागते. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर आणि अभ्यासावरही परिणाम हाेत आहे. सध्या ही कामेही मिळणे कठीण झाले आहे.

 

प्लॅटफॉर्मतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

विद्यार्थ्यांना संकटातून काढण्यासाठी दि. प्लॅटफार्म संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. संघटनेचे सदस्य राजीव खाेब्रागडे यांनी सांगितले, परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीअंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता तुटपुंजा असून त्यात १०-१२ वर्षांत एकदाही वाढ करण्यात आलेली नाही. त्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रयत्न करून समस्या साेडविण्याचा विश्वास दिल्याचे खाेब्रागडे यांनी सांगितले.

Web Title: Financial emergency in UK, Indian students in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.