लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:ला सीआयडी ऑफिसर म्हणवून घेणाऱ्या भामट्याने तरुणीला लग्नाचे तसेच तिच्या भावाला आणि मित्राला नोकरीचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळले. यश सुरेश पाटील (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो लोढा पार्क, एमजीनगर, विरार (पश्चिम) येथे राहतो. हुडकेश्वर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.ऋचिरा (वय २७) ही तरुणी म्हाळगीनगरात राहते. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती शेअर मार्केटिंगचे काम करते. तिची आणि आरोपी पाटीलची डिसेंबर २०१८ मध्ये ऑनलाईन ओळख झाली. त्याने संकेतस्थळावरून ऋचिराचा मोबाईल नंबर मिळवला. आपण सीआयडीत सब इन्स्पेक्टर असून, बांद्रा येथे कार्यरत असल्याचे त्याने ऋचिराला सांगितले. त्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यासाठी तो नागपुरात ऋचिराच्या घरी आला. त्याने तिच्या नातेवाईकांसमोर लग्नाची चर्चाही केली. जवळपास लग्न पक्के झाल्यासारखे सांगत त्याने ऋचिरासह तिच्या नातवाईकांचाही विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपले काका रेल्वेत मोठ्या पदावर आहेत, असे सांगून त्याने ऋचिराचा भाऊ आणि भावाचा मित्र या दोघांना रेल्वेत नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. बदल्यात ऋचिराच्या फेडरल बँकेच्या खात्यातून १० लाख रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. २६ जून २०१९ पर्यंत हा भामटा नियमित संपर्कात होता. रक्कम खात्यात वळती करून घेतल्यानंतर तो ऋचिरा आणि तिच्या कुटुंबीयांना टाळू लागला. कधी मुंबई, कधी हैदराबादला कारवाईसाठी गेल्याचे सांगून तो बनवाबनवी करू लागला. त्यामुळे ऋचिराच्या नातेवाईकांनी त्याची चौकशी केली असता तो सीआयडीत नाही आणि त्याचे काकाही रेल्वेत अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने ऋचिराने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार संदीप भोसले यांनी चौकशीनंतर सोमवारी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.अनेकींना गंडा ?स्वत:च्या खात्यात रक्कम वळती करून घेण्यापर्यंत आरोपी पाटील ज्या निर्ढावलेपणाने वागला आणि नंतर ज्या पद्धतीने त्याने ऋचिरा आणि तिच्या नातेवाईकांना टाळले, ते बघता तो सराईत गुन्हेगार असावा. त्याने अशाच प्रकारे अनेकींची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. त्याने सांगितलेले नाव आणि पत्ताही किती खरा आहे, तोसुद्धा तपासाचा विषय ठरला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.