नागपुरातील कळमना मार्केटमधील धान्याच्या गोदामाला लागली भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:01 PM2018-02-24T13:01:54+5:302018-02-24T13:02:03+5:30
येथील कळमना मार्केट परिसरात असलेल्या एका वेअरहाऊसला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कळमन्यातील एका चार माळ्याच्या गोदामाला शनिवारी पहाटे भीषण आग लागून सुमारे ६० हजार क्विंटल धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीमुळे तीव्र उष्णता निर्माण झाल्याने गोदामाची एका बाजूची भिंत आणि स्लॅब खाली कोसळली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ अधिकारी आणि ३० जवान घटनास्थळी धावले. गेल्या १२ तासांपासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आलेले नाही. सुदैवाने आगीमुळे कुणालाही दुखापत झालेली नाही.
कळमना मार्केटच्या मागे, कामठी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ कॅलिप्सो अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नामक हे वेअर हाऊस (गोदाम) आहे. प्रारंभी अफजलभाई नामक व्यक्तीने तेथे कोल्ड स्टोरेज उघडले होते. त्याच्याकडून ते दुसऱ्याने विकत घेऊन त्याचे हिमालय कोल्ड स्टोरेज असे नाव ठेवले. तेथे वारंवार छोट्यामोठ्या दुर्घटना होत असल्याने अग्निशमन दल तसेच संबंधीत विभागाने कारवाई केली होती. दोन वर्षांपूर्वी वीज आणि पाणी पुरवठा बंदची नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे स्टोरेज मालकाने सुधारणेच्या अटी मान्य करून तशी हमी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात दिली होती. दरम्यानच्या कालावधीत हे कोल्ड स्टोरेज बंद पडले अन् नंतर दक्षिणेतील रामन्नाराव बोला नामक व्यक्तीने ते विकत घेतले. त्याने कोल्ड स्टोरेज बंद करून तेथे कॅलिप्सो अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने गोदाम सुरू केले.
शनिवारी पहाटेच्या ३ च्या सुमारास गोदामातून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडताना पाहून तेथील चौकीदाराने मालकाला, पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तेथे धावले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप घेतले होते. आग विझविण्यासाठी अडचण येत असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साह्याने एका भिंतीला छिद्र पाडून आतमध्ये पाण्याचा मारा केला.
गोदामाची पडझड सुरू
उप मुख्य अग्निशमन अधिकारी, बी. पी. चंदनखेडे आणि त्यांचे ३० सहकारी १० बंबाच्या साह्याने आग विझविण्याचे १२ तासांपासून अविश्रांत प्रयत्न करीत होते. मात्र, आग विझण्याऐवजी वाढतच होती. त्यामुळे भिंत आणि स्लॅबमधील लोखंड वितळून पडझड सुरू झाली. दुपारी १ च्या सुमारास गोदामाची एक भिंत पडली. नंतर अर्ध्या तासाने स्लॅबही कोसळली.
सात ते आठ कोटींचे नुकसान
आग नेमकी कशाने लागली ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. आगीमुळे गोदामात ठेवलेली ३५ हजार क्विंटल तूर, १५ हजार क्विंटल धान आणि गव्हाचे १० हजार कट्टे तसेच अन्य साहित्यासह सुमारे ६० हजार क्विंटल धान्य जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या अग्निशमन अधिकारी चंदनखेडे यांनी लोकमतला दिली. त्याची किंमत सात ते आठ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.