नागपूरनजीकच्या बहादूरयात गुंडांचा गोळीबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:55 PM2017-11-14T20:55:30+5:302017-11-14T21:03:44+5:30

उमरेड रोडवरील बहादूरा येथे काही गुंडांनी पिस्तूल व चाकूने हल्ला करून एक महिलेला आणि तिच्या मुलाला जखमी केले. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

Firing of goons in Bahadur, Nagpur | नागपूरनजीकच्या बहादूरयात गुंडांचा गोळीबारात

नागपूरनजीकच्या बहादूरयात गुंडांचा गोळीबारात

Next
ठळक मुद्देआई व मुलगा जखमीतीन दिवसातील दुसरी घटनादहशतीचे वातावरण



ऑनलाईन लोकमत

नागपूर : उमरेड रोडवरील बहादूरा येथे काही गुंडांनी पिस्तूल व चाकूने हल्ला करून एक महिलेला आणि तिच्या मुलाला जखमी केले. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
जखमीमध्ये कुंदा संजय नगरधने (४४) , त्यांचा मुलगा भावेश (२२) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात शहरात घडलेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.
कुंदा नगरधने ह्या बहादुरा परिसरात पती संजय, दोन मुले भावेश व गुणवंत तसेच मुलगी वैष्णवी यांच्या सोबत राहतात. त्यांची या भागात ४ एकर जमीन आहे. मुलगा भावेश हा ट्रॅव्हल्सचे काम करतो. सोमवारी रात्री १२.१५ च्या सुमारास वैष्णवीला घराबाहेर काही आवाज ऐकू आला. तिने दार उघडून बाहेर बघितले असता, कुणीही आढळले नाही. मात्र ती दार लावत असताना पिस्तोलचा धाक दाखवून आरोपींनी तिला ओढून घेतले. वैष्णवीची मान पकडून तिला ढकलत ते तिला आतमध्ये घेऊन गेले.
दरम्यान आरोपींचे काही साथीदार चाकू घेऊन होते. वैष्णवीने आरडाओरड करताच घरातील सर्वजण जागे झाले. आरोपींनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून त्यांना चूप बसण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीला आरोपींच्या तावडीत पाहून भावेश संतापला आणि आरोपींवर तुटुन पडला. परंतु आरोपींनी त्याच्या पोटावर चाकुने वार केला. आपला मुलगा जखमी झाल्याचे पाहून आई कुंदा त्याला वाचवण्यासाठी धावताच आरोपींनी तिच्या पायावर गोळी झाडून जखमी केले. आई आणि भावाच्या जीवाला धोका असल्याचे बघून गुणवंतने लाठीने आरोपींवर हल्ला केला. गुणवंत अचानक आक्रमक झाल्यामुळे आरोपीच्या हातचा चाकू खाली पडला.
दरम्यान आरडाओरड ऐकून शेजारी राहणारा बंटी जागा झाला. त्याने तत्काळ पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्याबरोबर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर आयुक्त श्यामराव दिगांवकर, उपायुक्त एस. चैतन्य घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात लोकांना विचारले असता, परिसरात एक इनोव्हा गाडी संशयास्पद स्थितीत दिसल्याचे त्यांनी सांगितले. इनोव्हाच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी दिघोरी नाक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहे. परंतु पोलिसांना इनोव्हाचा कुठलाही पुरावा मिळाला नाही.

गुंड निर्ढावले

घडलेली घटना पाहू जाता गुंडांमध्ये पोलिसांचा भयच राहिला नाही, असे दिसते आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री जरीपटका येथे गुंडांनी गोळीबार करून दहशत माजवली होती. यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली आहे. नगरधने परिवारावर हल्ला करण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी तिघांकडे पिस्तुले होती.

नाकाबंदीचाही परिणाम नाही

या घटनेनंतर पोलीसांनी सक्करदरा ठाण्याच्या परिसरात नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली होती. संशयित इनोव्हा घटनेच्या पूर्वी बराच वेळ बहादूरा परिसरात फिरत होती. परंतु पोलिसांना माहितीच मिळाली नाही. यामुळे पोलिसांचे नेटवर्क कमजोर झाल्याचे दिसते आहे. बहादूरा सक्करदरा पोलीस ठाण्यापासून बºयाच अंतरावर आहे. परंतु बहादूरयाला लागून असलेला काही भाग नंदनवन ठाण्याच्या हद्दीत येतो. दिघोरी नाक्यावर पोलीस चौकी सुद्धा आहे. तिथे तैनात असलेल्या पोलीस   कर्मचारयांनाही याची माहिती मिळाली नाही.

Web Title: Firing of goons in Bahadur, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा