लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर एका कुख्यात गुंडाने गोळीबार केला. प्रसंगावधान राखल्याने विजय कडू नामक हवालदार बालंबाल बचावला. पोलिसांनी तशाही स्थितीत अतुल्य धाडसाचा परिचय देत जीवाची पर्वा न करता आरोपी नितीशच्या मुसक्या बांधल्या. शनिवारी सकाळी १०.३० वाजता शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज राऊत चौकात ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. नितीश देवराव चौधरी (वय २७, तेलीपुरा, पेवठा) असे गोळीबार करणाऱ्या गुंडाचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, नितीश चौधरी हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर तहसील, सीताबर्डी, पाचपावली, प्रतापनगर आणि लकडगंज पोलीस ठाण्यांसह अन्य ठिकाणी १२ ते १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिस्तूल बाळगणे, धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याच्यावर यापूर्वी तडीपार आणि स्थानबद्धतेचीही कारवाई झाली आहे. नितीश हा आज सकाळी कारने लालगंज राऊत चौकातील श्रीकांत मुळे यांच्या सुबोध मेडिकोजमध्ये आला. मुळे यावेळी दुकानात नव्हते. दुकानात असलेला कर्मचारी प्रेम निमजे याला त्याने ५०० रुपये हप्ता मागितला. त्याने हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे नितीशने कमरेला खोचलेली पिस्तूल काढली. त्यामुळे निमजे घाबरला. त्याने मालकाशी बोलण्यासाठी फोन काढला. दरम्यान, कुख्यात नितीश आज हप्तावसुलीसाठी साथीदारांसह लालगंज चौकात कारने येत असल्याची माहिती शांतिनगर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचारी राजेश ढोंगळे, विजय कडू, युवराज कावळे आणि मनोज सोमकुवर या परिसरातच घुटमळत होते. तो मेडिकोजमध्ये दिसताच पोलीस तिकडे धावले. पोलिसांना पाहताच नितीशने पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. प्रसंगावधान राखत विजय कडू खाली वाकले आणि अन्य पोलिसांनी नितीश याच्यावर झडप घालून त्याला खाली पाडले. त्याच्या मुसक्या बांधल्यानंतर त्याला शांतिनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्याकडून पिस्तूल आणि चार काडतूस तसेच कार जप्त करण्यात आली.पोलीस बचावलेकुख्यात नितीश कमालीचा धूर्त आहे. पोलीस आल्याचे पाहताच त्याने पिस्तूल बाहेर काढले आणि त्यांना धाक दाखवत गोळीही झाडली. सर्वच पोलिसांनी खास करून विजयने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला. गोळी झाडल्यास पोलीस घाबरतील आणि पळून जातील, असा आरोपीचा कयास होता. मात्र पोलिसांनी धाडसाचा परिचय देऊन गोळी चुकवण्यासोबतच त्याच्या तातडीने मुसक्या बांधल्या.कार कुख्यात गुंडाचीदरम्यान, या खळबळजनक घटनेची माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर, गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक आयुक्त वालचंद मुंढे यांनी शांतिनगर ठाण्यात पोहचून ठाणेदार किशोर नगराळे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी आरोपी नितीशच्या ताब्यातून आल्टो कार (एमएच ३१/ एएच ९६७२) जप्त केली. ही कार मानकापुरातील कुख्यात गुंड मुसा याची असल्याचे समजते. यावरून तो मुसा टोळीशी संबंधित असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलिसावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:29 PM
पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर एका कुख्यात गुंडाने गोळीबार केला. प्रसंगावधान राखल्याने विजय कडू नामक हवालदार बालंबाल बचावला. पोलिसांनी तशाही स्थितीत अतुल्य धाडसाचा परिचय देत जीवाची पर्वा न करता आरोपी नितीशच्या मुसक्या बांधल्या.
ठळक मुद्देबालंबाल बचावला पोलीस हवालदार आरोपीच्या बांधल्या मुसक्या : पिस्तूल, बुलेट जप्त