सुमेध वाघमारे
नागपूर : कर्करोग व इतरही आजारामुळे किंवा अपघातामुळे खराब होणारा जबड्याच्या जाॅईंटवर नागपूरच्या एका डॉक्टरने जबड्याचे कृत्रिम ‘इंटरलॉकिंग जाॅईंट’ तयार केले. त्याचे यशस्वी प्रत्यारोपण केले. देशात तयार केलेले हे पहिले ‘जाॅईंट’ आहे. विदेशातील कृत्रिम जाॅईंटच्या तुलनेत हा स्वस्त असून, निखळतही नाही. यामुळे तोंड उघडणे व बंद करण्याचे कार्य आता अगदीच सोपे झाले आहे. १४ वर्षांचे हे परिश्रम नुकतेच ‘इंडियन जनरल’मध्ये प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे, या संशोधनाला त्याचे ‘पेटंट’ही मिळाले.
प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. सुरेश चवरे असे त्या डॉक्टरांचे नाव. त्यांच्या संशोधनाची सुरुवात एका गरीब ५ वर्षांच्या गरीब कुटुंबातील मुलीपासून झाली. एका अपघातात रियाचा (बदललेले नाव) जबड्याचा सांधा (जाॅईंट) खराब झाला. हळूहळू तिचे तोंड उघडणे बंद झाले. ती अन्न चावू शकत नव्हती. बोलणेही जवळपास बंद झाले होते. तब्बल ७ वर्षे ती ‘लिक्विड फूड’वर होती. यावर खराब झालेल्या जबड्याचा जाॅईंटच्या जागी कृत्रिम जाॅईंट प्रत्यारोपण करणे, हा उपचार होता. परंतु तिच्या कुटुंबाला हा महागडा उपचार परवडणारा नव्हता. शिवाय, कृत्रिम जाॅईंट निखळण्याची भीती होती. अशा स्थितीत ती मुलगी डॉ. चवरे यांच्याकडे आली. त्या मुलीलाच नव्हे तर तिच्यासारख्या अनेक रुग्णांना कमी खर्चात हा उपचार मिळावा, या उद्देशाने डॉ. चवरे यांनी संशोधन सुरू केले.
-आजार व अपघातामुळे ‘टेम्परोमेंडीब्युलर जाॅईंट’ होतो खराब
डॉ. चवरे म्हणाले, मुखाचा कर्करोग, संधीवात (आर्थरायटीस), अपघात व वाढत्या वयामुळे जबड्याचा जाॅईंट याला वैद्यकीय भाषेत ‘टेम्परोमेंडीब्युलर जाॅईंट’ म्हटले जाते, तो खराब होतो. यामुळे तोंड उघडणे आणि बंद होण्याची महत्त्वाची क्रिया बंद होते.
-दोन ते तीन लाखांचा खर्च आला १३ ते १४ हजारांवर
रियावर कृत्रिम जाॅईंट बसविणे हाच उपचार होता. परंतु, हे जाॅईंट देशात तयार होत नसल्याने खर्चिक होते. जवळपास दोन ते तीन लाखांचा खर्च होता. तो तिच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता. म्हणून यावर संशोधन करण्याचे ठरविले. ‘व्हीएनआयटी’ येथील डॉ. अभय कुथे यांची मदत घेतली. अथक प्रयत्नाने नवे कृत्रिम जाॅईंट तयार केले. हे जाॅईंट केवळ १३ ते १४ हजार रुपयांत तयार झाले.
-सलग सात वर्षे पाठपुरावा
डॉ. चवरे म्हणाले, रिया जेव्हा १२ वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर याचे यशस्वी प्रत्यारोपण केले. भारतात तयार केलेल्या कृत्रिम जाॅईंटचे हे पहिले प्रत्यारोपण ठरले. शस्त्रक्रियेनंतर तिचे पहिल्यांदाच साडेतीन मिलिमीटर तोंड उघडले. त्यानंतर १५ दिवस, एक महिना, सहा महिने, त्यानंतर दरवर्षी असे सलग सात वर्षे पाठपुरावा केला. आज रिया २६ वर्षांची आहे. तिचे लग्न होऊन एक मुलगी आहे. कृत्रिम जाॅईंट योग्य पद्धतीने काम करीत असून, तिच्या जबड्याची हालचाल नैसर्गिक पद्धतीने होत आहे. कृत्रिम जाॅईंट पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे सिटी स्कॅनवरून दिसून येते.
-कृत्रिम जाॅईंटला मुलांचे नाव
भारतात तयार झालेल्या जबड्याच्या पहिल्या कृत्रिम जाॅईंटच्या या संशोधनाला आपल्या दोन मुलांचे नाव जोडून ‘सॅमसीड’ हे नाव दिले. १४ वर्षांच्या अथक परिश्रमाला यश आले, असेही डॉ. चवरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-भारतीय कृत्रिम ‘जाॅईंट’चे हे फायदे
:: आकाराने छोटा
:: यामुळे प्रत्यारोपणावेळी एकच चिरा लागतो.
:: चेहऱ्यावर छोटी खूण राहते
:: हे जाॅईंट निखळत नाही
:: स्वस्त आहे
:: जबड्याचा दोन्हीकडे वापर करता येतो
- विदेशी कृत्रिम ‘जाॅईंट’चे हे तोटे
:: आकाराने मोठा
:: यामुळे प्रत्यारोपणाच्या वेळी दोन चिरा द्यावा लागतो
:: चेहऱ्यावर दोन मोठी खूण राहते
:: हे जाॅईंट निखळण्याची भीती असते.
:: महागडे आहे.
:: वेगवेगळ्या उपचारात वेगवेगळे जाॅईंट वापरावे लागतात.