लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रा. रिधाेरा, ता. काटाेल) याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आराेपींना शनिवारी काटाेल येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची अर्थात बुधवार (दि. १९) पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा. रेस्ट हाऊसजवळ, काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा. धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा. धर्मशाळेच्या मागे, तारबाजार, काटोल) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या तिघांनी गुरुवारी (दि. १३) रात्री क्षुल्लक कारणावरून अंगदला त्याच्याच क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला सावळी (पर्बत) शिवारात फेकून देत परत काटाेलला आले. त्यानंतर आराेपी परत घटनास्थळी गेले आणि त्यातील एकाने अंगदचा चाकूने गळा चिरून खून केला. शिवाय, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून जाळले.
ही बाब उघड हाेताच पाेलिसांनी तिन्ही आराेपींना शुक्रवारी (दि. १४) अटक केली. तिघेही व्यसनी असून, दारू व गांजाच्या नशेत असल्याने त्यांना शनिवारी काटाेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत तिन्ही आराेपींना बुधवारपर्यंत पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. या तिघांनीही अंगदचा किरकाेळ कारणावरून खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. पाेलीस काेठडी काळात खून करण्याचे मूळ कारण व यात सहभागी असलेले अन्य आराेपी उघड हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.