मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:03+5:302021-02-26T04:10:03+5:30
रियाज अहमद नागपूर : नेहाल बढोले, संदीप मुळे, सचिन डेकाटे, हरीश निमजे आणि शंकर ही त्या दुर्दैवी व्यक्तींची नावे ...
रियाज अहमद
नागपूर : नेहाल बढोले, संदीप मुळे, सचिन डेकाटे, हरीश निमजे आणि शंकर ही त्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत की ज्यांना शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत या जगाला रामराम करावा लागला. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आजही १५ पेक्षा अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या आशेने शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. ‘लोकमत’ने मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील व्यक्तीसोबत केलेल्या संपर्कानंतर ही खळबळजनक माहिती पुढे आली. यातील नेहाल बढोले याचे महिनाभरापूर्वी निधन झाले. वेळेवर शस्त्रकिया झाली असती तर आपल्या मुलाचे प्राण वाचू शकले असते, अशी खंत त्याच्या वडिलांनी डोळ्यात पाणी आणून व्यक्त केली.
सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षभरापासून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बंद आहे. अद्यापही परवानगी मिळालेली नाही. मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पाच वर्षांचा कालावधी मागील महिन्यात संपला. प्रत्यारोपण समन्वयकांचा कार्यकाळही मागील महिन्यातच संपला. मात्र अद्यापही प्रत्यारोपण नूतनीकरणाच्या परवानगीचा अवधी वाढविण्यात आला नाही, त्यामुळे नव्या समन्वयकाचीही नियुक्ती झाली नाही. होणारी रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन बुधवारी येथील विभागप्रमुखांनी अधिष्ठात्यांना पत्र लिहून परिस्थिती कळविली.
...
मागील वर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पाच ते सहा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मात्र कोरोना संक्रमणामुळे त्या बंद करण्यात आल्या. डिसेंबरमध्ये एक प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या परवानगीचा अवधी पाच वर्षांचा होता. ती मागील महिन्यात संपली. नूतनीकरणासाठी सर्व प्रक्रिया डिसेंबरमध्येच पूर्ण झाली आहे. अद्यापही परवानगी मिळालेली नाही.
- डॉ. चारु बावनकुळे, किडनी विभागप्रमुख
...
बॉक्स
किडनी मिळाली मात्र प्रत्यारोपणाची परवानगी नाही
सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधिकारी व किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मेराज शेख म्हणाले, एक दिवसापूर्वीच शहरातील एका खासगी रुग्णालयाकडे एका रुग्णासाठी किडनी आली होती. यामुळे प्रतीक्षा यादीतील एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकली असती. मात्र आपला कार्यकाळ समाप्त झाल्याने प्रत्यारोपणासाठी परवानगी मिळाली नाही.
...