नागपुरात पाच लाखावर घरे असताना नळ कनेक्शन कमी का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:00 PM2018-05-18T23:00:37+5:302018-05-18T23:00:50+5:30
नागपुरात ५ लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा आणि नव्याने मीटर द्यावे. चालू आर्थिक वर्षात पाणी बिल वसुलीपोटी ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात ५ लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा आणि नव्याने मीटर द्यावे. चालू आर्थिक वर्षात पाणी बिल वसुलीपोटी ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
‘डीआरए’ कन्सलटन्सीने सादर केलेला प्रकल्प राबविण्याचे कार्य ओसीडब्ल्यू करीत आहे. मात्र डीआरएच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत स्थायी समिती सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातही एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा, असेही निर्देश कुकरेजा यांनी दिले. नागपूर शहरात होणारा पाणीपुरवठा, नागरिकांच्या तक्रारी, थकीत बिलाची वसुली, अवैध नळ कनेक्शनचे नियमितीकरण, अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती आदी विषयांवर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मनपा मुख्यालयात विशेष बैठक पार पडली. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, जुल्फेकार भुट्टो, राजेश मानकर आदी उपस्थित होते.
बैठकीत अनेक जलवाहिनींवर सिमेंट रस्ते तयार झाले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांंनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. पुढील बैठकीपासून ओसीडब्ल्यूने वसुलीचे महिनानिहाय विवरण सादर करावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती कुकरेजा यांनी दिले.
५३ हजार ग्राहकांना सरासरी बिल
सध्या नागपुरात ३ लाख ३० हजार एकूण नळ कनेक्शन असून त्यापैकी २ लाख ४० हजार ग्राहकांच्या मीटरची रिडींग घेण्यात येते. ५३ हजार ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येते. २२ हजार ग्राहकांना फ्लॅट बिल पाठविण्यात येते. थकबाकीदारांमध्ये ५० हजार ते १ लाख थकबाकी असलेले २२७६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखांवरील थकबाकीदार ७९३ आहेत. पाच हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख २४ हजार आहे. एक लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या २२७६ पैकी १८०० ग्राहकांची नळ जोडणी कापली असून अन्य ग्राहकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली.
१५ दिवसात मीटर लावा
ज्या ग्राहकांचे मीटर चोरीला गेले आहे, अशा ग्राहकांकडे पुढील १५ दिवसांत मीटर लागायला हवे. यासाठी ग्राहकांना प्रथम नोटीस देण्यात यावी. १५ दिवसात ग्राहकांनी मीटर बदलवावे, अन्यथा मनपा ते मीटर बदलवेल. मीटरची किमत सहा महिन्यांत बिलामधून टप्प्याटप्प्याने वसूल केली जाईल, असे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. यावर झालेल्या चर्चेनंतर ग्राहकांनी ५० टक्के रक्कम द्यावी, ५० टक्के रक्कम ओसीडब्ल्यूने भरावी, अशी सूचना काही सदस्यांनी दिली. चर्चेअंती हा विषय निर्णय घेण्यासाठी एनईएसएलकडे पाठविण्याचे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. जुन्या बिलाच्या तडजोडीचा निर्णय घेण्याचा विषयही एनईएसएलकडे वर्ग करण्यात आला.