नागपूर: ‘नीट’चे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी काटाेलहून धावपळीचा प्रवास करताना ऐनवेळी गाडीने दगा दिला. ती ऑटाे पकडून कशीबशी धापा टाकत परीक्षा केंद्रापर्यंत पाेहचली पण तेव्हा दुपारचे १.३५ मिनिटे झाली, म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा तिला ५ मिनिटे उशीर झाला हाेता. ती केंद्र चालकांना विनंती करू लागली, अक्षरश: रडू लागली पण त्यांना पाझर फुटला नाही. ती शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले, तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला. परीक्षा केंद्राचे लाेक वेळ पाळल्याच्या अभिमानात हाेते, तिचे मात्र वर्ष वाया गेले.
हे दृश्य रविवारी श्रीकृष्णनगरच्या भवन्स शाळेच्या गेटवर अनेकांनी पाहिले. भाविका सांगाेळे असे या मुलीचे नाव आहे. रविवारी नीटची परीक्षा हाेती. काटाेल येथे राहणाऱ्या भाविकाने यासाठी वर्षभर तयारी केली हाेती. आज सकाळी ती बहिणीसाेबत गाडीने काटाेलहून नागपूरच्या निर्धारित केंद्राकडे निघाली. मात्र शहरामध्ये अचानक तिची गाडी पंक्चर झाली. तिथे वेळ घालविण्यापेक्षा बहिणीला थांबवून ती ऑटाेने केंद्राकडे निघाली. मात्र वेळेत पाेहचायला तिला यश आले नाही. पाचच मिनिटे उशीर झाला आणि तिच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.