मुंबईत उड्डाणासाठी तयार विमानाचे उड्डाण रद्द : नागपूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 08:56 PM2019-10-02T20:56:25+5:302019-10-02T20:56:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी मुंबईहून नागपूरकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार असलेले एअर इंडियाचे एआय ६२७ विमान अचानक रद्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी मुंबईहून नागपूरकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार असलेले एअर इंडियाचे एआय ६२७ विमान अचानक रद्द करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे एअरलाईन्सने विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या विमानात नागपुरातील ७६ प्रवासी होते. नागपूर विमानतळावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे उड्डाण मुंबईत रद्द झाल्याचे कळताच त्यांनी काहीवेळ गोंधळ घातला. प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडे येणारे प्रवासी विमानात बसले होते. हे विमान मुंबईहून सकाळी ६.०५ वाजता रवाना होण्यासाठी धावपट्टीवर तयार होते. पण वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे आढळून आले. त्यांनी उड्डाणास नकार दिला.
हे विमान नागपुरात पोहोचल्यानंतर एआय ६२८ बनून ७.४५ वाजता रवाना होते. नागपूर विमानतळावर या विमानाचे प्रवासी वाट पाहत होते. विलंबानंतरही विमान न आल्यामुळे नागपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर संपर्क साधला. तेव्हा विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे कळले. त्यानंतर नागपुरात एअर इंडिया एअरलाईन्सतर्फे विमानाचे उड्डाण रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आणि प्रवाशांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या दरम्यान बहुतांश प्रवाशांना सकाळी ९ ते १० दरम्यानच्या गो एअर आणि इंडिगोच्या विमानाचे तिकीट घेण्याचा सल्ला देण्यात आला. यादरम्यान अनेक प्रवासी नाराज झाले अणि त्यांनी काऊंटरवरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. कर्मचाऱ्यांनी स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांना बोलविले. त्यांनी असंतुष्ट प्रवाशांना समजविले. काही प्रवाशांना एअर इंडियाच्या रात्री ९.२० विमानाने मुंबईला पाठविण्यात आले.
दुसऱ्या विमानाची व्यवस्था नाही
शासकीय एअरलाईन्स एअर इंडियाचे एआय ६२७ विमान रद्द केल्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या शहरातून कंपनीने प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाची दोन विमाने पूर्वीपासूनच जागेवर उभी असल्यामुळे उड्डाणासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.