नागपूर : सदर फ्लायओव्हरवरून एलआयसी चाैकाकडे उतरणाऱ्या वाहनांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत नाहीत. या भागातील पुलाचा अरुंदपणा अडचणी निर्माण करीत आहे. एलआयसी चाैक मेट्राे स्टेशनच्या खालून वाहने वळविण्यासाठीही जागा कमी आहे. यामुळे सदर फ्लायओव्हरच्या या परिसरात नेहमीच जाम लागलेला दिसत आहे.
फ्लायओव्हरच्या उद्घाटनानंतरच ही अडचण लक्षात आली होती. यामुळे उपाययोजना म्हणून एनआयटीच्या समोरून रस्ता देण्यात आला होता. माहितीगार सूत्रांच्या मते, योग्य ठिकाणी पुलाचा आराखडा न झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. एलआयसी चाैकाकडून स्टेशन, कामठी राेड व सदर आणि फ्लायओव्हरवरून येणारी वाहने आरबीआय चाैकात रेड सिग्नलवर थांबतात, हे सुद्धा जाम लागण्याचे दुसरे महत्वाचे कारण आहे. मेट्राेच्या कस्तूरचंद पार्क स्टेशनपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे फ्लायओव्हरवरून उतरणाऱ्या वाहनांना पुलावरच उभे राहावे लागते. मेट्राे स्टेशनखाली असणाऱ्या वळणावरही वाहनचालकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.