स्थलांतरितांना घरी पाठवताना नियम पाळा : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:44 PM2020-05-05T23:44:52+5:302020-05-05T23:48:29+5:30
शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठवताना शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठवताना शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला.
उच्च न्यायालयात कोरोनासंदर्भात विविध याचिका प्रलंबित असून त्यात हा आदेश देण्यात आला. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र अॅड. अनुप गिल्डा यांनी शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठवताना शारीरिक अंतर व अन्य नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन हा आदेश दिला. तसेच, शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करताना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी संबंधित ठिकाणी पोलीस तैनात करावेत आणि पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी करावी असेही न्यायालयाने सांगितले.