भूकेने व्याकूळ तरुणीवर बळजबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:59+5:302021-08-26T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भुकेने व्याकूळ तरुणीवर एका नराधमाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर विरोध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भुकेने व्याकूळ तरुणीवर एका नराधमाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर विरोध केला असता तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस ऐनवेळी पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना सक्करदरा येथील सिंधीबन येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
असलम ऊर्फ कल्लू जऊर खान (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो ताजाबाद परिसरात खेळणी विकतो. पीडित २० वर्षीय तरुणी छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील रहिवासी आहे. ती मंगळवारी आपल्या एका मैत्रिणीसह बसने नागपूरला पोहोचली. त्या दोघीही भुकेने व्याकूळ हाेत्या. पैसे नसल्याने त्यांनी लोकांकडे मदत मागितली. काही लोकांनी त्यांना ताजाबादला जाण्याचा सल्ला दिला. दोघी रात्री १२ वाजता ताजाबादला पोहोचल्या. तिथे कल्लूची तिच्यावर नजर गेली. त्याने त्या दोघींनी जेवणासह काम व राहण्याची जागा देण्याचे आमिष दाखविले व आपल्यासोबत घरी नेले. रात्री १ वाजता कल्लू एका तरुणीसोबत बळजबरी करू लागला. धोका ओळखून तरुणीची मैत्रीण पळण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा कल्लूने तिच्यावर चाकूने वार करून जखमी केले. जखमी अवस्थेतही ती तरुणी पळाली. परिसरात फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांची तिच्यावर नजर गेली. पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, कल्लूने ज्या तरुणीला बंधक बनवले होते तीसुद्धा पळून गेली. पोलिसांनी तरुणीच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क केला आणि तिला शोधून काढले. यानंतर कल्लूच्या घरी जाऊन त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध छेडखानी, मारहाण, धमकावणे आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.