परराष्ट्र धोरणात राष्ट्रहिताशी तडजोड नाही : सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 08:53 PM2018-11-27T20:53:48+5:302018-11-27T21:19:16+5:30
हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या चाळिसाव्या स्मृतिप्रीत्यर्थ रामनगर येथील श्रीशक्तिपीठ येथे नूतनीकृत शिल्पाच्या लोकार्पणप्रसंगी सुषमा स्वराज बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का,कार्यवाहिका स्मिता केळकर व अध्यक्षा डॉ. गरिमा सप्रे आदी उपस्थित होत्या.
युनोतील १९१ देशांपैकी अनेक देशांचे आपसात पटत नाही. अमेरिका-रशिया, सौदी अरब-इराण यांच्यात वाद आहेत. परंतु भारताने जागतिक संबंधांच्या संतुलनाचे प्रयोग केले; म्हणूनच आपसात पटत नसलेल्या अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक केली जाते. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून विदेशात नेले जाते. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळत नाही. त्यांना विदेशातून परतही येता येत नाही. एनडीए सरकारच्या काळात अशी फसवणूक झालेल्या २ लाख २ हजार ६६६ लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
मावशी केळकर यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न होते. त्यानुसार पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’,पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना हाती घेतल्या आहेत. महिला सशक्त झाली तर देश सशक्त होईल. या हेतूने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लघु व मध्यम उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध केली जाते. यात तीन टक्के महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी यावेळी केला.
शांतक्का म्हणाल्या, मावशी केळकर यांच्या प्रेरणेतून श्रीशक्तिपीठाचे कार्य सुरू आहे. शिल्पाच्या माध्यमातून यापुढेही प्रेरणा मिळणार आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन मेघा नांदेकर यांनी केले. यावेळी श्रीशक्तिपीठाच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.