माजी सरपंच, उपसरपंचानी गड राखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:34+5:302021-01-23T04:09:34+5:30
विजय नागपुरे कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच, उपसरपंच यांनी पुन्हा विजयी होत आपले राजकीय अस्तित्व ...
विजय नागपुरे
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच, उपसरपंच यांनी पुन्हा विजयी होत आपले राजकीय अस्तित्व कायम राखले. यात सावंगी (घोगली) चे माजी सरपंच प्रज्वल तागडे तर सेलू (गुमथळा) चे माजी उपसरपंच प्रकाश पांडे यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येत हॅट् ट्रिक साधली. गावपुढारी ग्रामपंचायत निवडणूक डोक्यावर घेत राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यात प्रसंगी आपला गट निवडणूक रिंगणात उतरवित स्वत:ही मैदानात उतरतात. या वर्षीच्या झालेल्या निवडणुकीत चार ग्रामपंचायतीमधून माजी सरपंच, उपसरपंच यांनी आपले राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यात ते यशस्वीही राहिले. तालुक्यात प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या सेलु (गुमथळा) ग्रामपंचायत मधून माजी सरपंच चित्रा डोईफोडे व माजी उपसरपंच प्रकाश पांडे हे भाजपा समर्थित गटाकडून निवडणूक रिंगणात होते. येथे काँग्रेसतर्फे प्रदीप चणकापुरे यांनी सेलू येथून पाच उमेदवार निवडून आणले तर भाजपा समर्थित गटाकडून माजी सरपंच चित्रा डोईफोडे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. तसेच गुमथळा येथील माजी उपसरपंच प्रकाश पांडे यांनी याही वर्षीच्या निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनल कडून तिसऱ्यांदा विजयी होत हॅट् ट्रिक केली तर पॅनल सुद्धा विजयी करत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. तसेच सावंगी (घोगली) ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच प्रज्वल तागडे यांनी घोगली या गावातून काँग्रेस समर्थित पॅनेल उभे केले होते. त्यांनी विजयाची परंपरा कायम राखत तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट् ट्रिक साधली आहे.
सावंगी येथून माजी सरपंच संजय तभाने हे दोन पंचवार्षिक सरपंच राहिले आहेत. त्यांनी यावेळी पत्नी नीता तभाने यांना निवडणूक रिंगणात उभे करीत विरोधक उमेदवारापेक्षा तब्बल दुप्पट मताने विजय खेचून आणला. येथीलच माजी सरपंच मिना धरममाळी यांनीही विजय संपादन केला. तसेच कोहळी (मोहळी) ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिचखेडे यांनी निवडणूक रिंगणात उभे राहत काँग्रेस समर्थित पॅनलकडून ११ उमेदवार उभे केले. त्यापैकी ७ जागांवर विजय मिळविला. याच ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सुनंदा वानखेडे यांना काँग्रेस समर्थित पॅनल कडून उमेदवारी न दिल्याने त्यांचा मुलगा देवकांत वानखेडे यांनी अपक्ष म्हणून निवडून येत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. बिनविरोध झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच चेतन निंबाळकर यांना पुन्हा गाव सेवेची संधी मिळाली आहे.