माजी सरपंचाच्या मुलाची हत्या अनैतिक संबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:47 AM2018-04-25T00:47:30+5:302018-04-25T00:47:40+5:30
तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांचा मुलगा नरेंद्र हरिणखेडे (वय ३५) याची निर्घृण हत्या करून पळून गेलेला मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किसन भावसिंग सोळंकी याला नंदनवनच्या पोलीस पथकाने मंगळवारी भोपाळ जवळ अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांचा मुलगा नरेंद्र हरिणखेडे (वय ३५) याची निर्घृण हत्या करून पळून गेलेला मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किसन भावसिंग सोळंकी याला नंदनवनच्या पोलीस पथकाने मंगळवारी भोपाळ जवळ अटक केली. पत्नीसोबत नरेंद्रचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून २२ एप्रिलच्या रात्री सोळंकीने नरेंद्रची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये लपविला. याकामी त्याने त्याचा मित्र दिनेश कुंवर मौर्य याचीही मदत घेतली होती. सोमवारी सायंकाळी हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर नंदनवन पोलिसांनी दिनेश कुंवर मौर्य याला अटक केली होती तर मुख्य आरोपी रूपसिंगच्या शोधात पोलीस पथक मध्य प्रदेशात रवाना केले होते.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रूपसिंग ऊर्फ किसन भावसिंग सोळंकी आणि त्याची पत्नी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी शिवारात झंवर फार्महाऊसमध्ये काम करायचे. बाजूलाच नरेंद्र हरिणखेडे याचे शेत होते. पिकाची देखभाल, मजुरांवर लक्ष ठेवण्यासाठी नरेंद्र नेहमी तेथे जात होता. त्यातून त्याची रूपसिंगच्या पत्नीसोबत मैत्री झाली. रूपसिंग कामावर जाताच तो त्याच्या घरी यायचा. याची कुणकुण लागल्याने रूपसिंग कमालीचा संतापला होता. शहानिशा करण्यासाठी अनेक दिवसांपासून रूपसिंग पाळतीवर होता. सोमवारी रात्री नरेंद्र हरिणखेडे रूपसिंगच्या घरात गेला. तेथे रूपसिंगच्या पत्नीसोबत तो बसला असताना बाजूलाच दडून बसलेला रूपसिंग तेथे आला. त्याने नरेंद्रला शिवीगाळ करीत त्याच्यासोबत भांडण केले. वाद विकोपाला गेल्यानंतर रूपसिंगने नरेंद्रवर काठीने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर फटका हाणून त्याला खाली पाडल्यानंतर दगडाने ठेचले आणि नंतर गळा आवळला. त्याला ठार केल्यानंतर आरोपीने त्याचा मित्र कुंवर मौर्य याला बोलवून घेतले. त्याला या हत्याकांडात फसवण्याची भीती दाखवून नरेंद्रचा मृतदेह एका पाईपलाईनमध्ये कोंबण्यासाठी मदत करण्यास भाग पाडले. त्यानंतर सोमवारी सकाळी रूपसिंग पत्नीसह फरार झाला. इकडे नरेंद्र अचानक बेपत्ता झाल्याने माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि आप्तस्वकीयांसह नरेंद्रची शोधाशोध सुरू केली. नरेंद्र स्वत:च्या शेतातून रूपसिंगच्या घरी जात होता. रात्री तो रूपसिंगकडे गेला होता आणि तेथे दिनेश मौर्य हा देखील होता, अशी माहिती हरिणखेडे यांना मिळाली.
त्यावरून हरिणखेडे यांच्या सहकाऱ्यांनी मुकेश अग्रवाल यांच्या डेअरी फार्मवर काम करणाºया दिनेशला विचारपूस केली. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या हरिणखेडे यांच्या सहकाºयांनी दिनेशला बदडले. त्यानंतर हे थरारक हत्याकांड उघड झाले.
हरिणखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दिनेशने दिलेल्या माहितीवरून नरेंद्र हरिणखेडेचा पाईपलाईनमध्ये कोंबलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पत्नीसोबत नरेंद्रचे अनैतिक संबंध माहीत झाल्यानेच रूपसिंगने हे हत्याकांड केल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी लगेच आरोपीचे लोकेशन शोधण्यास सांगितले. तो भोापाळकडे पळाल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यासाठी एक पथक तिकडे पाठविण्यात आले. या पथकाने आज दुपारी त्याला भोपाळजवळ अटक केली. त्याला घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच हत्या
२२ एप्रिलला नरेंद्र हरिणखेडेचा वाढदिवस होता. दिवसभर काम आटोपल्यानंतर तो शेतमालाची देखभाल करण्याच्या निमित्ताने शेताकडे आला अन् त्याच रात्री आरोपीने डाव साधला. विशेष म्हणजे, कृष्णा हरिणखेडे या भागातील जमीनदार म्हणून ओळखले जातात.