लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. विकी गजभिये, तपन जयस्वाल, बंटी बोरकर आणि समीर ऊर्फ बाळा राऊत अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी गजभिये, बोरकर आणि राऊत ते तिघे गुन्हेगारी वृत्तीचे असून ते काही दिवसापूर्वीच कारागृहातून बाहेर आले आहे. जयस्वाल मद्य विक्रेता आहे. समीर दिलीपराव इंगळे (वय २५) हा गोपालनगरात राहतो. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, १९ एप्रिल २०१९ रोजी आरोपींनी त्याला ७० हजार रुपये व्याजाने दिले होते. त्याला १५ टक्के दरमहा व्याज द्यायचे होते. दिलेली रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या कोऱ्या चेकवर तसेच कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. इंगळे याचा आरोपी विकी गजभिये हा मित्र होता. मात्र, या व्यवहारानंतर त्याचे इंगळे सोबत वर्तन बिघडले होते. तो इंगळेला नेहमी धमकी देऊन मारहाण करत असल्यामुळे इंगळेने गुन्हे शाखेत तक्रार केली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री बजाजनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी आणि खंडणी वसुलीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. उपरोक्त चौघांना अटक करण्यात आली आहे.
नागपुरात रक्कम वसुलीसाठी मारहाण : चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 9:52 PM
अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देअवैध सावकारी उघड