माैदा : धाब्यासमाेर उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमधून ८५ हजार रुपये राेख व दाेन माेबाईल फाेन चाेरून नेणाऱ्या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ॲक्टिव्हा आणि माेबाईल फाेन जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई कामठी शहरात शनिवारी (दि. १०) मध्यरात्री करण्यात आली.
बादल संजय संतापे (२०) व सूरज विकास रंगारी (२७) दाेघेही रा. रमानगर, कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. महालगाव (ता. कामठी) शिवारातील धाब्यासमाेर ट्रक उभा असताना कुणाचेही लक्ष नसताना त्या ट्रकच्या केबिनमधून दाेन माेबाईल फाेन आणि ८५ हजार रुपये राेख चाेरीला गेले हाेते. ही घटना शनिवारी (दि. १०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली हाेती. संबंधित व्यक्तीने तक्रार नाेंदविल्याने माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा माैदा पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
ही चाेरी बादलने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी मध्यरात्री कामठी शहरातून बादलला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत सूरजचे नाव सांगितल्याने या पथकाने त्यालाही ताब्यात घेत दाेघांनाही अटक केली. त्यांच्याकडून एमएच-४०/बीपी-९६०९ क्रमांकाची ॲक्टिव्हा आणि दाेन माेबाईल फाेन जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली असून, त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही व्यक्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, साहेबराव बहाळे, विनाेद काळे, वीरेंद्र नरड, शैलेश यादव, अरविंद भगत, सत्यशील काेठारे यांच्या पथकाने केली.