चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्री : हवामान विभागाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:01 AM2019-04-28T00:01:12+5:302019-04-28T00:02:08+5:30
चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे.
शनिवारी शहरातील तापमान ०.१ डिग्रीने वाढून ४५.३ डिग्रीवर पोहचले. राज्यामध्ये अकोल्यात सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक ४६.७ डिग्री तापमानाची नोंद झाली. इतर चार शहरांतही पाऱ्याने ४६ डिग्रीचा टप्पा ओलांडला. तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले. शहरातील रोड रोज दुपारी निर्जन होऊन जातात. हवामान विभागाने नागपूरमध्ये येत्या आठवडाभर उष्ण लाट येण्याचा इशारा देऊन २८ ते ३० एप्रिलदरम्यान तापमान ४६ डिग्रीचा टप्पा ओलांडेल व १ मे रोजी ४७ डिग्रीपर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, २ मे रोजी तापमान एक डिग्रीने कमी होईल असेही अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अंदाज खरा ठरल्यास नागपूरकरांचे तापमानामुळे हाल होतील. त्यांना तापमानापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे, उन्हाशी संपर्क टाळणे इत्यादी उपाय करावे लागतील.
असा आहे अंदाज
दिनांक तापमान
२८ एप्रिल ४६
२९ एप्रिल ४६
३० एप्रिल ४६
१ मे ४७
२ मे ४६
४६ डिग्रीची शहरे
अकोला - ४६.७
चंद्रपूर - ४६.५
ब्रह्मपुरी - ४६.४
अमरावती - ४६
वर्धा - ४६