चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:07 PM2018-04-06T23:07:20+5:302018-04-06T23:07:39+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
राजेंद्र गुलाब बोलधन (५३), जिरालाल नर्मदाप्रसाद दुबे (५५), अरविंद प्रल्हाद सराफ (५२) व वसंत कवडू आडे (६६) अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आडे पोलीस निरीक्षक, सराफ पोलीस उपनिरीक्षक, दुबे हेड कॉन्स्टेबल तर, बोलधन कॉन्स्टेबल होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
२८ आॅक्टोबर २००३ रोजी गणेशपेठ पोलिसांना बजेरियामधील वाजपेयी मंदिराजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बोलधन व दुबे यांनी मनोज वर्मा यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. राजेश यादव यांच्या तक्रारीवरून वर्मा यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४ व ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. दरम्यान, रात्री ८.१५ च्या सुमारास वर्मा यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वर्मा यांचे भाऊ सुजित यांच्या तक्रारीनंतर आवश्यक चौकशी करून पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे अॅड. राजेंद्र डागा व अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.