नागपुरात विमा रुग्णालयाला मिळाले चार स्पेशालिस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:15 AM2018-11-06T00:15:17+5:302018-11-06T00:15:59+5:30
कामगार विमा रुग्णालयात साधारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच चार विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांचे कंत्राट ४ आॅक्टोबर रोजी संपले. यामुळे रुग्णालय अडचणीत आले होते. याची दखल राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा सचिव मुकुंद मुळे यांनी घेतली. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा केला. यामुळे चारही डॉक्टरांचे कंत्राट नूतनीकरणाला नुकतीच मंजुरी मिळाल्याने रुग्णालय प्रशासनासह कामगार रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार विमा रुग्णालयात साधारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच चार विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांचे कंत्राट ४ आॅक्टोबर रोजी संपले. यामुळे रुग्णालय अडचणीत आले होते. याची दखल राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा सचिव मुकुंद मुळे यांनी घेतली. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा केला. यामुळे चारही डॉक्टरांचे कंत्राट नूतनीकरणाला नुकतीच मंजुरी मिळाल्याने रुग्णालय प्रशासनासह कामगार रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात वर्षाकाठी पाच लाख कामगार उपचार घेतात. या रुग्णालयावर १२ लाख कामगारांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र रुग्णालयात सोयीबाबत शासन उदासीन असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे व अद्ययावत सोयींच्याअभावी कामगार रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. रुग्णालयाचा एकेक विभागही बंद पडत चालला आहे. यात चार विशेषज्ञ डॉक्टरांचे कंत्राट गेल्याच महिन्यात संपले. रुग्णसेवाच कोलमडली होती. परंतु काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन त्याचा पाठपुरावा केला. परिणामी, कंत्राट नूतनीकरण करून रुग्णसेवेवर होणार परिणाम टळला. नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. आदित्य परिहार (छातीतज्ज्ञ), डॉ. अशोक लवंगे (अस्थितज्ज्ञ), डॉ. भाग्यश्री (कान, नाक, घसा तज्ज्ञ) आणि डॉ. मधुकर दुपारे यांचा समावेश आहे. आता काळे यांनी शिल्लक ५० टक्के पद भरतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगार रुग्णांकडून होत आहे.
नासुप्रने जागा द्यावी
विमा रुग्णालयाच्या बाजूला १६ हजार चौरस फूट जागा असून, ही जागा विमा रुग्णालयाच्या विस्तारासाठी शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुळे यांनी केली आहे. सध्या ही जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित आहे. जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधार प्रन्यासकडे पत्रव्यवहार केला आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास कामगार रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, असे मुळे यांनी सांगितले