लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारचाकी आता केवळ श्रीमंतांच्याच दारात उभी राहते, हे चलन आता मोडीस निघाले आहे. मोठमोठ्या वाहन कंपन्यांनी देऊ केलेल्या सवलती, बँकांनी राबविलेले सुकर कर्ज धोरण आणि इस्टॉलमेण्टमध्ये कोणतेही वाहन सहज खरेदी करता येत असल्याने सर्वसामान्य पगारदार वर्ग, लहान-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक चारचाकींचे स्वप्न पूर्ण करत आहेत. त्याचा परिणाम शहरात चारचाकींची संख्या प्रचंड वाढली आहे आणि वाहन ठेवण्यासाठीची जागा तोकडी पडत आहे. स्वत:च्या चारचाकी स्वत:च्या घरी पार्क करण्यासाठी व्यक्ती तशी सोय करून ठेवतो. मात्र, त्याच वाहनाने तो कुठेही गेला तर जागेअभावी वाहन पार्क करण्यास अडचण होते. अशा स्थितीत वा कुणाच्या घरापुढे, प्रतिष्ठानापुढे तर कधी रस्त्यावरच वाहन पार्क केली जातात. अशा तऱ्हेने वाहन कुठेही उभी केली जात असल्याने रस्ता आपसूकच निमुळता होतो आणि बरेचदा इतर वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागतो. अशा अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. कुठेही वाहन उभ्या करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, तरीही वाहन कुठेही उभे करण्याचे प्रकार वाढत आहेत. या स्थितीवर कशा तऱ्हेने नियंत्रण मिळवता येईल, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
------------
कुठेही वाहन पार्क कराल तर कारवाई होणार
कुठेही वाहन पार्क केल्यास कलम १२२ व १८४ अंतर्गत डेंजरस पार्किंगची कारवाई होते. रस्त्यावर गाडी सोडून कोणी गेला तर ही कारवाई केली जाते.. पोलीस जवळ आलेले पाहून आपल्याच गाडीजवळ कुणी येत नाहीत. तेव्हा जॅमर लावला जातो. काही वेळ वाट बघूनही कुणी आला नाही तर गाडी क्लेममध्ये टाकली जाते. तेव्हापासून प्रत्येक तासाला ५० रुपये दंड असा आकार वाढत जातो. नो पार्किंग कारवाई, अनवॉण्टेड स्पॉट पार्किंग कारवाई, अशीही कारवाई होते. राँग साइड वाहन उभे केले तर डेंजरस पार्किंगची कारवाई केली जाते.
- जागवेंद्रसिंग राजपूत, पीआय, ट्राफिक
-------------
सीताबर्डी, महाल, सक्करदरा, मेडिकल सर्वात व्यस्त परिसर
शहरात सीताबर्डी, धंतोली, महाल, सक्करदरा, मेडिकल, सदर, गोकुळपेठ हे भाग प्रचंड व्यस्ततेचे आहेत. या मुख्यत: बाजारपेठा असल्याने येथे ठिकठिकाणी वाहने उभी केली जातात. त्याचा परिणाम प्रचंड गर्दी वाढलेली दिसते. बरेचदा अपघातही झालेले आहेत. अनेकांना त्यात प्राणही गमवावे लागले आहेत.
-------
पार्किंग स्थळाची उणीव
चारचाकी वाढल्या आहेत. शहराचा विस्तारही होत आहे. मात्र, त्या तुलनेत वाहनतळांची निर्मिती झालेली नाही. बाजारपेठांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. अनेक दुकानांमध्ये, रेस्टेराँमध्ये ग्राहकांच्या वाहनांसाठी व्यवस्थाच केली नसते. त्यामुळेही कुठेही वाहन उभे केले जात असल्याचे दिसून येते. अनेक व्यावसायिकांची मोठमोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने आहे. मात्र, ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात नाही. उलट पार्किंगसाठी रस्ताच आपल्या कब्जात घेत असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत दोष कुणाचा, हा प्रश्न आहे.
-------------------
शहरात तीन लाखाच्या वर चारचाकी
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६च्या अधिकृत आकडेवारीनुसार शहरात खासगी चारचाकी एक लाख नऊ हजार १८१ चारचाकी आहेत. याशिवाय, जीप, पॅसेंजर ऑटो, प्रायवेट ऑटो, टुरिस्ट टॅक्सिज, स्टेजे कॅरिएजेस, कॉण्ट कॅरिएजेस, स्लिपर कोचेस, स्कूल बसेस, खासगी सेवा वाहने, क्रेन्स, रुग्णवाहिका, डिलिव्हरी व्हॅन्स, पाणी टँकर, केरोसीन टँकर, गुड टँकर्स, डिझेल-पेट्रोल टँकर्स, ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स आदी मिळून तीन लाखाच्यावर संख्या जाते. यात दरवर्षी १० टक्केची भर पडत असते. त्यामुळेही वाहन पार्किंगची समस्य उद्भवत आहे.
-----------
शहराची लोकसंख्या - २८,९३,०००
शहरात दुचाकी - १४,८४,५१३
शहरात चारचाकी - ३,२६,७४२
.............