नागपुरातील हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुलींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 PM2021-01-19T16:25:07+5:302021-01-19T16:35:12+5:30
Nagpur News मध्यभारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मध्यभारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मोहब्बतसिंग यांच्या पुतण्यानेच फसवणुकीची ही तक्रार पोलिसांत नोंदविली, हे विशेष.
अजिंदरसिंग गुरुलालसिंग तुली (वय ६०, रा. क्लॉर्क टाऊन) असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते मोहब्बतसिंग यांचे पुतणे असल्याचे समजते. त्यांनी मोहब्बतसिंग कपूरसिंग तुली यांच्यासोबत २ जुलै २०११ ला गांधीबाग ईतवारीत बॉम्बे गुडस् ट्रान्सपोर्ट गॅरेज कंपनी सुरू केली होती. भारत सरकार मंत्रालय कंपनी रजिस्ट्रर मुंबई येथील कार्यालयात ग्रेट रोडवेज प्रा. लि. कंपनीच्या नावाने नोंदणी करण्यात आली.
या कंपनीत फिर्यादी अजिंदरसिंग १९९४ पासूनच कार्यरत होते. कंपनीच्या स्थापनेनंतर अजिंदरसिंग यांनी कंपनीच्या नावे ७५ टक्के शेअर्स खरेदी केले होते. कंपनीत अजिंदरसिंग यांचे वडील गुरुलालसिंग कपूरसिंग तुली (मोहब्बतसिंग यांचे बंधू ) हे सुद्धा संचालक होते. त्यांनी ग्रेट रोडवेज कंपनीच्या नावाने १७,५०० शेअर्स खरेदी केले होते. अशाप्रकारे अजिंदरसिंग आणि त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण २२, ५०० शेअर्स होते. अजिंदरसिंग यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अजिंदरसिंग यांनी घरातील कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांना स्वत:च्या आणि वडिलांच्या नावे असलेल्या २२, ५०० शेअर्सबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी कंपनीत विचारपूस केली असता ते शेअर्स मोहब्बतसिंग तुली यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना कळले. याबाबत अजिंदरसिंग यांनी मोहब्बतसिंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दाद दिली नसल्याचे समजते. कोणताही करार किंवा निर्णय झाला नसताना मोहब्बतसिंग यांनी अजिंदरसिंग यांचे शेअर्स आपल्या नावाने करून आपला विश्वासघात केल्याची भावना झाल्यामुळे अजिंदरसिंग यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रे तपासल्यानंतर तहसील पोलिसांनी सोमवारी मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
साथीदार कोण ?
फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हणून मोहब्बतसिंग यांचेच नाव दिले आहे. मात्र, कलम ३४ ही लावले आहे. त्यामुळे या फसवणुकीत मोहब्बतसिंग यांच्यासोबत आणखी आरोपी असल्याचे स्पष्ट होते. ते दुसरे आरोपी किती आणि कोण, ते मात्र पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.