महिला लेखापालाने केली हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:02+5:302021-06-28T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वाहनांच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या एका महिला लेखापालाने संगणकात बनावट नोंदी करुन आणि बनावट पावत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाहनांच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या एका महिला लेखापालाने संगणकात बनावट नोंदी करुन आणि बनावट पावत्या छापून ३१ लाख रुपये लंपास केले.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उन्नती व्हील्स मोटर्स आहे. येथे आरोपी महिला लेखापाल आणि रोखपाल अशी दुहेरी जबाबदारी सांभाळायची. तिने ग्राहकांकडून रक्कम घेतल्यानंतर त्यांना मूळ पावत्या दिल्या. मात्र, व्यवस्थापनाकडे तिने बनावट पावती सादर केली. एवढेच नव्हे तर तिने कार्यालयीन संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून त्यात कमी रकमेच्या नोंदी केल्या. ग्राहकांकडून ही रक्कम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आल्याचीही नोंद केली. २३ सप्टेंबर २०२० पासून तिची ही बनवाबनवी सुरू झाली. ती अलिकडे लक्षात आल्यानंतर महाव्यवस्थापक विष्णू अग्रवाल (वय ५१, रा. गणेशपेठ) यांनी तिला २४ जूनला विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपी महिलेने ३१ लाख, ४४ हजार, ७८० रुपयांची अफरातफर केल्यामुळे आणि ती रक्कम परत करण्यास अथवा आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नसल्यामुळे अखेर अग्रवाल यांनी कपिलनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अफरातफर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
---
आरोपी महिला फरार
आरोपी महिला शोरूममध्ये अडीच वर्षांपासून काम करीत होती. बनावट पावत्यांपासून कार्यालयीन सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यापर्यंतच्या गुन्ह्यात ती एकटीच आहे की तिला आणखी कुणी सहकार्य केले, असा प्रश्न आहे. दरम्यान, शनिवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच ती फरार झाली. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
---