कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Published: March 4, 2016 02:49 AM2016-03-04T02:49:35+5:302016-03-04T02:49:35+5:30
शासकीय योजनेनुसार झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो गोरगरीब महिलांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे.
फसगत झालेल्यात गोरगरीब महिला : आरोपी पसार
नागपूर : शासकीय योजनेनुसार झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो गोरगरीब महिलांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
आरोपी संजय सदाशिव सरदार, त्याची पत्नी (रा. एनआयटी क्वॉर्टर नारी रोड) आणि कृष्णा संतोष बघेले (वय ३६, रा. राजीवनगर) यांनी गेल्या वर्षी बचतगट तसेच महिलांना खादी ग्रामोद्योगांतर्गत १० लाखांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली होती. कर्णोपकर्णी माहिती मिळाल्यामुळे रमा दिलीप ससाने (वय ४०, रा. साईनगर, हिंगणा रोड) आणिं अन्य १०० पेक्षा जास्त महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
कर्ज अन् अनुदानही
आरोपींनी भोळ्याभाबड्या महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी चांगले कार्यालयही थाटले होते. त्यांनी संपर्क साधला त्या प्रत्येकीला ते कर्जाचे आमिष दाखवायचे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी बतावणी करून आरोपी संपर्क साधणाऱ्या प्रत्येकाला आणखी महिलांना घेऊन यायला सांगत होते. अशा प्रकारे एकीने दुसरीला आणि दुसरीने तिसरीला आरोपींच्या कार्यालयात नेले. १० लाखांचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यासोबतच २० ते ३५ टक्केपर्यंत कर्जाच्या रकमेतून शासन अनुदानही देणार असल्याची बतावणी आरोपींनी केली. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येकीने आरोपींकडे वेगवेगळी रक्कम जमा केली. जून ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत लाखोंची रक्कम गोळा केल्यानंतर आरोपी पसार झाले. चार महिन्यांपासून ते संपर्कात नसल्यामुळे हवालदिल महिलांनी बुधवारी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विष्णूकांत भोये यांनी लगेच त्याची दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, बुधवारी पोलिसांकडे चाळीसएक महिला आल्या. आता हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
जनधन योजना
अशाच प्रकारे जनधन योजनेनुसार आपल्या कंपनीकडून अल्प व्याजदरात आणि अल्पावधीत कर्ज मिळवून दिले जात असल्याची जाहिरात मॅट लाईन्स फायनान्स को आॅपरेटिव्ह लि. कंपनीने वर्तमानपत्रात दिली होती. ती वाचून ते २० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत एमआयडीसीतील शिवविहार कॉलनीत राहणारे मिलिंद सेवकराम विजेवार (वय ३०) यांनी कंपनीत संपर्क केला. आयशा मेहरा, मिस वंदना मेहरा, मिस निरू आणि कंपनीच्या इतरांनी त्यांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात वेगवेगळी कारणं सांगून ११,२५० रुपये उकळले. आता चार महिने झाले तरी कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली नाही. उपरोक्त कंपनीच्या संचालकांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे विजेवार यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली.