रेल्वे स्थानकावरील कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:09 PM2020-07-04T23:09:46+5:302020-07-04T23:11:14+5:30
रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका ठेका कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका ठेका कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून युवकांपासून रक्कम घेत त्यांना नोकरीवर लावून देण्याचे आमिष देण्यात आले. परंतु अनेक दिवस होऊनही नोकरी न मिळाल्याने यामधील एका युवकाने पोलिस आणि रेल्वेमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या ठगबाजाने त्याची रक्कम परत केली.
रेल्वे सूत्रानुसार नागपूर रेल्वेस्थानकावर वॉटरिंगचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी रेल्वेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी एका दलालामार्फत युवकांकडून दहा हजार रुपये घेतले. नोकरीच्या शोधात भटकत असलेल्या या युवकाने ही रक्कम दलालास दिली. या दलालामार्फत ही रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत पोहचविण्यात आली की नाही याची माहिती युवकांना पोहोचली नाही. परंतु बरेच दिवस झाल्यानंतरही युवकांना नोकरी मिळाली नाही.
अशात यामधील कामठी येथे राहणाऱ्या युवकाने नोकरी मिळत नसल्याने रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून दलालामार्फत त्याला दहा हजार रुपये परत करण्यात आले. त्यानंतर युवकाने रेल्वे पोलिस ठाणे आणि रेल्वे श्रमिक संघटनेत तक्रार केली. युवकाला त्याचे पैसे परत मिळाल्याने रेल्वे पोलिसांनीही या प्रकरणात तपास सुरू केलेला नाही.