धावत्या रेल्वेगाडीत फुकट्या महिला प्रवाशांचा टीसीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:37 AM2019-11-28T11:37:27+5:302019-11-28T11:38:23+5:30
धावत्या रेल्वेगाडीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर महिलांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर महिलांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडीत प्रवास करीत असलेल्या तृतीयपंथीयांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला असून या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उमेश सहारे (४५) रा. न्यू नंदनवन हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वरिष्ठ तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहेत. ते १२२९६ दानापूर-सिकंदराबाद संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सायंकाळी ६.१५ वाजता सुटली.
प्रवाशांचे तिकीट तपासत असताना सहारे एस ४ कोचमध्ये गेले. त्यांनी या कोचमधील महिलांना तिकिटाबाबत विचारणा केली.
कोचमधील महिलांनी तिकीट दाखविले नाही आणि उलट त्यांच्यासोबत वाद घातला. वाद वाढला आणि महिलांनी टीसीला पाहून घेण्याची धमकी दिली.
सेवाग्राम रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असताना तीन पुरुष तेथे आले. काही समजण्यापूर्वीच महिला आणि पुरुषांनी सहारे यांच्यावर हल्ला केला.
मात्र, कोचमधील तृतीयपंथी धावून आले. त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. वाद घालणाºया महिला विनातिकीट प्रवास करीत होत्या. याबाबत सहारे यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार केली. लोहमार्ग पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.