जगदीश जोशी
नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास दोन हजार टॅक्सी मालकांना कोट्यवधीचा चुना लावला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साडेपाच महिन्यांपासून फरार असूनही पोलीस त्याला शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळेच बंजारा चार महिन्यातच दिल्लीतूनही कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील पीडितांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
बंजारपा मुळचा जळगावचा आहे. त्याची सासुरवाडी उमरेडची आहे. तो अनेक वर्षांपासून टॅक्सी भाड्याने चालवण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत आहे. त्याच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात गुन्हे दाखल आहेत. त्याने कोरोना संसर्गादरम्यान एलआयसी चौकाजवळ कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी सुरु केली होती. टॅक्सी मालकांना त्याच्याशी जुळल्यास टॅक्सीच्या मोबदल्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. रजिस्ट्रेशनच्या नावावर शहरात ७५०० आणि शहराबाहेरसाठी १७,५०० रुपये घेतले होते. जुलैमध्ये टॅक्सी सर्व्हीस सुरु केली. ऑगस्टमध्ये रोख रक्कम अदा केली. परंतु सप्टेंबरमध्ये धनादेश दिले. त्यानंतर ते धनादेश बाऊन्स झाल्यावर तो टॅक्सी मालकांना वेगवेगळे कारण सांगू लागला. परंतु मालकंनी पैसे परत मागण्यासाठी दबाव वाढवला तेव्हा तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. १४ सप्टेंबर रोजी ससदर पोलिसांनी दिनेश मिश्रा यांच्या तक्रारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सूत्रानुसार तपासात जवळपास ४५० टॅक्सी मालकांकडून ४.२० कोटी रुपयाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५० पेक्षा अधिक लोकांची साक्षही नोंदवून घेतली.
नागपुरातून फरार झाल्यानंतर बंजारा मुंबई मार्गे दिल्ली पोहोचला. दिल्लीच्या वजीरपूर येथे नेताजी सुभाष पॅलेस येथे त्याने योयो टॅक्सी सर्व्हीस सुरु केली. तिथे सुद्धा त्याने नागपूरच्या धर्तीवर टॅक्सी मालकांना आपल्या जाळ्यात अडकविले. डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत २ हजार टॅक्सी मालक बंजाराच्या योयो सर्व्हीसशी जुळले. त्याने ६५ ते ३५ हजरा रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर घेतले. नेहमीप्रमाणे पहिल्या महिन्यात त्याने वेळेवर पैसे परत केले. टॅक्सी मालकांचा विश्वास बसल्याने अनेक लोक त्याच्याशी जुळले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. टॅक्सी मालकांनी वजीरपूर ठाण्यात, डीसीपी आणि ईडीकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बंजारा नागपुरातील एका पीडित टॅक्सी मालकाची कार घेऊन फरार झाला होता. ती कार ५ ऑक्टोबर मुंबईत चालान झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दिल्लीतील काश्मिरी गेट, ८ डिसेंबर रोजी वजीराबाद आणि १३ जानेवारी २०२१ रोजी कॅम्प चौक येथे चालान झाले. कार मालकास मोबाईलवर ई-चालान झाल्याचा एसएमएस आला. त्याने लगेच सदर पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा आरोपीला सहजपणे शोधता आले असते परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.