लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासोबत संशोधनासाठी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. सध्या विविध परदेशी विद्यापीठांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु राज्य सरकारने शिष्यवृत्तीची रक्कमच न दिल्याने संबंधित विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे अकाऊंट बंद केले. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नसून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारची प्रतिमाही मलिन होत आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. वर्ष २०१९-२० करिता ७४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कमच जमा केली नाही. निधी मिळाला नसल्याने आॅस्ट्रेलियातील विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे अकाऊंट बंद (ब्लॉक) केले. विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती, प्रवेशपत्र व इतर आवश्यक माहिती याच अकाऊंटवर पाठविण्यात येते. अकाऊंट बंद असल्याने विद्यार्थ्यांना कुठलीच माहिती मिळत नाही. त्यांना परीक्षा देता येणार नसल्याने त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. पैसे न पाठविल्याची मोठी अडचण होत आहे. त्यांच्या जेवणाचा व राहण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी कसेबसे करून पैसे भरले परंतु ज्यांचे पालक पैसे भरण्यास सक्षम नाहीत, त्या विद्यार्र्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तातडीने निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करूविदेशात शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधून याबाबत व्यथा मांडली आहे. त्यांनी विभागाशीही संपर्क साधला आहे, परंतु काहीही उत्तर मिळत नाही. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. शिष्यवृत्ती जमा न झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत. विदेशात शिकणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात तातडीने शिष्यवृत्ती जमा न झाल्यास आंदोलन केले जाईल.-अनिकेत कुत्तरमारे, समता सैनिक दल