लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान देशभरात गणधराचार्य कुंथुसागर गुरुदेव यांचा आंतरराष्ट्रीय अमृत महोत्सव पार पडणार असल्याची माहिती आचार्यश्री गुप्तीनंदी गुरुदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवनंदी गुरुदेव, राष्ट्रसंत गुणधरनंदी गुरुदेव, प्रज्ञायोगी गुप्तीनंदी यांच्या प्रेरणेने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, पद्मभूषण वीरेंद्र हेगडे, श्री श्री रविशंकर, योगगुरू रामदेवबाबा, आचार्यश्री विजयरत्नसुंदर सुरीश्वर शिवमुनी म.सा., बी.के. शिवानी, राष्ट्रसंत ललितप्रभू म.सा., चंद्रपभ म.सा. उपस्थित राहणार आहेत. ३० डिसेंबरला सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७५ तीर्थ, ७५ जिन मंदिर, ७५ गृह चैत्यालयात सामूहिक महामस्तकाभिषेक होईल. दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत गुरुवंदना व गणधर आचार्य विधान होईल. यात सर्व भक्तमंडळ आपल्या घरूनच यात सहभागी होऊ शकणार आहेत. ३१ डिसेंबरला सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत श्रीजींचा महामस्तकाभिषेक, महाशांतीधारा होईल. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत वचनामृत होईल. १ जानेवारीला सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत श्रीजींचा महामस्तकाभिषेक होईल. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत गुरुकृपा विनयांजली दर्शन होईल. संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल. पत्रपरिषदेला आचार्य लोकेश मुनी, संतोष जैन पेंढारी, नितीन नखाते, रमेश उदेपुरकर, ललित पाटणी, प्रकाश अजमेरा, सुनील काला, पवन पाटणी, वत्सल जैन, महावीर पाटणी, भरतकुमार काला, दिलीप राखे उपस्थित होते.