लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्याच्या नावातच आरंभाचे गमक दडले आहे, अशा श्रीगणेशाच्या आगमनाच्या आनंदात अवघा आसमंत फुलला आहे. बाप्पा म्हणजे समस्त महाराष्ट्राचे लाडके दैवत. अवघे भक्तगण वाट पाहत असलेला गणरायाच्या आगमनाचा क्षण येऊन ठेपला आणि सर्वजण त्याच्या स्वागताच्या लगबगीत व्यस्त झाले. गुरुवारी गणेश चतुर्थी म्हणजे गणरायाचा विराजमान होण्याचा दिवस. पण विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चैतन्यदायी, मंगलदायी आणि निसर्गप्रिय आनंदयात्रेला बुधवारपासूनच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तसा तो दरवर्षीच येतो. काही दिवस का होईना, पण आपले दु:ख, व्यथा व वेदना बाजूला ठेवून प्रत्येक जण नव्या उत्साहाने आणि जोमाने गणेशोत्सवासाठी तयारीला लागतात. म्हणून प्रत्येक वर्षी त्याच्या येण्याचा उत्साह ओसंडून वाहतो. हा उत्साह नागपूरकर भाविकांमध्येही भिनला आहे. त्याच सळसळत्या उत्साहाची प्रचिती शहरात दिसून येत आहे.शहरातील चितार ओळ हे गणेश मूर्ती मिळण्याचे मोठे ठिकाण. गणेश चतुर्थीची धावपळ आणि गर्दी लक्षात घेता, बहुतेकांनी आदल्या दिवशीच गणरायाला घरी नेण्याची तयारी केली. त्यामुळे बुधवारी बाप्पाला घरी नेण्यासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेला होता. सर्वत्र ढोलताशे आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज होता. अशात ‘गणपती बाप्पा मोरया..., एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ अशा आरोळ्यांनी संपूर्ण परिसर प्रचंड उत्साहाने भारून गेला होता. या उत्साहाच्या वातावरणात जनमन भारावून गेले होते. वाद्यांच्या मिरवणुकीतून नाचत कुणाच्या मोटरसायकलवर, कुठे कारमध्ये, ट्रक टेम्पो तर कुणाच्या सायकलवर स्वार होऊन गणराज घरोघरी, सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान झाले. बाप्पांचा दहा दिवसांचा मुक्काम राहणार असून, आनंदयात्रेत सारे तल्लीन होणार आहेत. त्याच्या येण्याच्या आनंदात सारे घरच न्हाऊन निघाले. श्रींची स्थापना, प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भाविकांची घाई झाली...मोरया रे बाप्पा मोरया रे...च्या घोषात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शहरातील घराघरांत श्रींची विधिवत स्थापना करण्यात येत आहे. भक्तीच्या, भजन आणि अभंगांच्या वातावरणात श्रींच्या सहवासात आज भाविकांचा अख्खा दिवस आनंदात गेला.आपल्या आराध्य दैवताला काहीही कमी पडू नये याची काळजी भाविक चोखपणे घेत आहेत. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणारे सारेच सामान, जिन्नस जुळवण्यात गृहिणी व्यस्त होत्या. आता बाप्पा दहा दिवस घरात राहणार म्हणजे नुसता आनंदोत्सव...सारेच वातावरण त्याच्या उपस्थितीने पावित्र्याने भारलेले असणार.घराघरांत मंत्रोच्चाराच्या घोषात श्रींची स्थापना करण्यात आली. धूप, दीप, उदबत्तीने साग्रसंगीत आरती, पूजनाने श्रींच्या भक्तीतच हा दिवस रंगला. गणरायासाठी सजावट करण्याची स्पर्धाच लागली. थर्माकोलचे रेखीव खांब, रंगवलेल्या मखरी, मोत्यांच्या विविध आकारातील सुबक माळा, फुलांचे मोहक हार, गणेशाला आवडणाऱ्या दुर्वांचा हार आणि सजावटीला सौंदर्याची किनार देणाऱ्या