मुनगंटीवार समिती करणार गंगाकाठ हिरवागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:26 AM2017-11-15T00:26:40+5:302017-11-15T00:26:52+5:30
गंगानदीचा काठ आता अधिक हिरवागार व वनसंपन्न होणार आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या काठावर तब्बल १० कोटी झाडे लावण्याची योजना आखली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगानदीचा काठ आता अधिक हिरवागार व वनसंपन्न होणार आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या काठावर तब्बल १० कोटी झाडे लावण्याची योजना आखली आहे. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार व पश्चिम बंगालचे मंत्री या समितीचे सदस्य असतील.
केंद्र सरकारने झुडपी जंगल व चराईच्या जागा यांना वन जमिनीऐवजी चराईची जागा म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे आता लाखो हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले तर पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल, अशी संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत गडकरी यांनी गंगाकाठी वृक्षलागवड करण्याची योजना आखली आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून काही राज्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला होता. त्यासाठी त्यांनी ग्रीन आर्मी तयार केली होती. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. हे काम रेकॉर्ड करणारे ठरले होते. यामुळे गंगाकाठी १० कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुखपदी वनमंत्री मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे.
१०० नर्सरी, वाराणसीत कार्यालय
या प्रकल्पासाठी १०० अत्याधुनिक नर्सरी तयार केल्या जातील. या नर्सरीत तयार होणारी रोपे गंगा काठावर लावली जातील. त्याचे संगोपन केले जाईल. या प्रकल्पासाठी नेमलेल्या समितीचे कार्यालय वाराणसी येथे सुरू होणार आहे. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.