गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:59+5:302021-09-21T04:10:59+5:30
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही उत्सवावर निर्बंध असले तरी दहा दिवस बाप्पांच्या आगमनाचा सोहळा भक्तांनी साजरा केला. या दहा दिवसांत ...
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही उत्सवावर निर्बंध असले तरी दहा दिवस बाप्पांच्या आगमनाचा सोहळा भक्तांनी साजरा केला. या दहा दिवसांत श्रीगणेशाच्या अस्तित्वाने घराला आणि परिसराला धार्मिक स्वरूप आले होते. अनंत चतुर्दशीला बाप्पाने दरवर्षीप्रमाणे निरोप घेत भक्तांना सुख, समृद्धी, शांती, आरोग्यवर्धनाचा आशीर्वाद दिला. दहा दिवसांत विशेषत: घरातील लहान मुलांना बाप्पाबद्दलची आसक्ती निर्माण झाली होती. त्यामुळे, बाप्पाला आपण घरीच ठेवू, अशी आळवणी ते करीत होते. मात्र, मोठ्यांनी त्यांची समजूत घालत, पुढच्या वर्षी लवकर या... असे आवाहन करण्यास सांगितले. त्याअनुषंगाने प्रशासनाने नियोजित केलेल्या व्यवस्थेनुसार अनेक गणपती मूर्ती वस्त्या-वस्त्यांमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम टाकीमध्ये करण्यात आले. अनेक मूर्ती तलावाशेजारी उभारण्यात आलेल्या टाकीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. निर्माल्य संकलन, मूर्ती विसर्जन करण्यात स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, प्रशासन व पोलीस पथकांनी मोलाची भूमिका पार पाडली. एकूणच बाप्पाने पुढच्या वर्षी लवकर येण्याचे मनोमन आश्वासन देत आपल्या प्रिय भक्तांचा निरोप घेतला.
............