नागपूर : नगरपालिका प्रशासन आणि कचरा संकलन करणारा कंत्राटदार यांच्यात वाद निर्माण झाल्याने कंत्राटदाराने तीन दिवसांपासून कचरा संकलन करणे बंद केले आहे. त्यामुळे रामटेक शहरातील घंटागाड्यांची चाके थांबली असून, तीन दिवसांपासून कचऱ्याची समस्या ऐरणीवर आली आहे. हा वाद लवकर निकाली न काढल्यास शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता बळावली आहे.
रामटेक शहरातील घराघरातील कचरा संकलन कंत्राटी पद्धतीने केले जाते. स्थानिक पालिका प्रशासनाने या कामाचे कंत्राट हिवराबाजार (ता. रामटेक) येथील शारदा महिला मंडळ या संस्थेला दिले हाेते. त्यांच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०२१ राेजी संपली हाेती. त्याचे नूतनीकरणही करण्यात आले नव्हते. शारदा महिला मंडळाच्या वतीने शहरातील कचरा संकलनाचे काम सुरूच हाेते.
पालिका प्रशासनाने तीन महिन्यांची कचरा संकलनाची बिले न दिल्याने आपण गुरुवार (दि. ३) पासून शहरातील कचरा संकलन कार्य बंद करीत असल्याचे शारदा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला कळविले हाेते. ही संस्था संकलित केलेला शहरातील कचरा डम्पिंग यार्डमध्ये टाकून देते. त्याचे वर्गीकरण करीत नाही. त्यामुळे तेथे घाण तयार हाेते. वारंवार सूचना देऊनही व्यवस्थित काम केले जात नाही. याच कारणामुळे नागपूरच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी दंड ठाेठावला हाेता.
पालिका प्रशासन स्वत: कामगारांमार्फत ही कामे करते. कंत्राटदार संस्थेला त्यांनी केलेल्या कामाची बिले हवी असतील तर त्यांनी अटींचे काटेकाेर पालन करावे. कचरा संकलन ही अत्यावश्यक सेवा असल्याने ती थांबविता येत नाही. ही कामे थांबविण्यात आल्यानंतर गाड्यांच्या चाव्या परत न करणे ही गंभीर बाब आहे, असेही नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तीन महिन्याची बिले प्रलंबित
कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही शारदा महिला मंडळ रामटेक शहरातील कचरा संकलनाचे काम करीत हाेते. रामटेक नगरपालिकेकडे नाेव्हेंबर २०२१ ते जाने २०२२ या तीन महिन्यांची कचरा संकलनाची बिले प्रलंबित आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ही बिले प्रलंबित राहिल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. दुसरीकडे, पालिका प्रशासन बिले द्यायला तयार नसल्याचे शारदा महिला मंडळाचे पदाधिकारी सांगतात.
प्रकरण पाेलीस ठाण्यात
कंत्राटदार संस्थेने तीन घंटागाड्या आणि दाेन ट्रॅक्टरच्या चाव्या नगरपालिका प्रशासनाला परत केल्या नाहीत, अशा आशयाची तक्रार पालिकेचे सफाई मुकादम राजेश गुरुप्रसाद चिंटाेले यांनी रविवारी (दि. ६) रामटेक पाेलीस ठाण्यात नाेंदविली आहे. ही तक्रार कंत्राटदार संस्थेच्या अध्यक्षांच्या विराेधात आहे. विशेष म्हणजे या तीन घंटागाड्या व दाेन ट्रॅक्टर पालिका प्रशासनाने कंत्राटदार संस्थेला दिले हाेते. यावर पाेलिसांनी अद्याप काहीही कारवाई केली नाही.
पालिकेचा कार्यकाळ संपुष्टात
रामटेक नगरपालिकेचा कार्यकाळ साेमवारी (दि. ७) संपत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते या पालिकेच्या प्रशासक म्हणून मंगळवारी (दि. ८) पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाची समस्या कशी साेडविली जाते, याकडे रामटेकवासीयांचे लक्ष लागले आहे.
सध्या दाेन गाड्या व एका ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन केले जात आहे. कामगार लावून व गाड्या किरायाने घेऊन कचरा संकलन केले जाईल. मुदत संपल्यावर कचरा गाड्या परत करायला पाहिजे हाेत्या. दाेन दिवस वाट पाहूनही चाव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. कचऱ्याचे नीट वर्गीकरण करून दिले असते तर बिल मागे-पुढे काढता आले असते.
- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष, नगर परिषद, रामटेक.