दोन महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत ११५.५० रुपयांची कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:24 PM2020-04-03T23:24:20+5:302020-04-03T23:26:36+5:30
तेल कंपन्यांनी ३१ मार्चच्या मध्यरात्री १४.२ किलो भरतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची कपात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या घसरणीचा फायदा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या वाहनचालकांना होत नसला तरीही गॅस सिलिंडरधारकांना निश्चितच होत आहे. तेल कंपन्यांनी ३१ मार्चच्या मध्यरात्री १४.२ किलो भरतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची कपात केली. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ५२.५० रुपयांची कपात केली होती. दोन महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ११५.५० रुपयांची घसरण झाली आहे.
दरकपातीमुळे गृहिणींना एप्रिलमध्ये सिलिंडर खरेदीसाठी ७८९.५० रुपये द्यावे लागतील. दरकपातीचा ग्राहकांना फायदा होणार आहे. सबसिडीधारक ग्राहकांना त्यावर १९८ रुपयांची सबसिडी मिळणार आहे. ही सबसिडी ग्राहकांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार ग्राहकांना वर्षात सबसिडीचे १२ सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर ग्राहकांना खरेदीसाठी सिलिंडरची पूर्ण किंमत द्यावी लागेल. भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांतर्फे गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात होण्याची सलग दुसरी वेळ आहे. घरगुती गॅस सिलिंडरसह १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही कपात केली असून दर १४९९ रुपयांवरून १४०३ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. दर महिन्यात एलपीजीवरील कर आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजी दर आणि विदेशी चलनाच्या दरानुसार बदलतात.