नागपुरी संत्र्याला भौगोलिक नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 02:12 PM2020-10-05T14:12:52+5:302020-10-05T14:13:13+5:30
Oranges Nagpur News विदर्भातील नागपूरी संत्रा प्रसिद्ध असल्यामुळे डॉ. पं. दे. कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रकाश नागरे आणि शशांक भराड यांच्या चमुने या संत्र्याला भौगोलिक नामांकन पाच वर्षांपूर्वी मिळवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: विदर्भ अॅग्रिकल्चर अँड अल्काईड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (वॅपको) या शिखर संस्थेस संलग्न असलेल्या श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीमार्फत ११ संत्रा उत्पादकांचा भौगोलिक नामांकनाचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे हस्ते बंगलोरच्या कायदेशीर सल्लागार झहेदा मुल्ला यांचेकडे पाठविण्यात आला.
विदर्भातील नागपूरी संत्रा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि अद्वितीय आंबटगोड चवीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे डॉ. पं. दे. कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रकाश नागरे आणि शशांक भराड यांच्या चमुने या संत्र्याला भौगोलिक नामांकन पाच वर्षांपूर्वी मिळवून दिले. तदनंतर संत्रा उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी नोंदणी शुल्क जास्त असल्याने वैयक्तिक नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही.
ही बाब महाआॅरेंजचे राहुल ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे नामांकन शुल्क घटवून केवळ १० रुपये नाममात्र शुल्क आकारणीचे राजपत्र केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केले. नुकताच पीकेव्ही अकोला आणि विनलेक्सीसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये शासनाच्या आवाहनानंतर श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनी मार्फत ११ शेतकऱ्यांनी भौगोलिक नामांकन शुल्क, कायदेशीर सल्लागार शुल्क असे प्रती शेतकरी ३५५ रुपये प्रमाणे प्रस्ताव तयार करून विनलेक्सीस कंपनीच्या संचालक झहेदा मुल्ला यांचेकडे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे मार्फत पाठविण्यात आला आहे.
यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संत्र्याचे भौगोलिक नामांकन प्रमाणपत्र प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सातदिवे, काणे, संगेकर, श्रीराव व श्रमजीवीचे अध्यक्ष निलेश मगर्दे, रमेश जिचकार, प्रमोद कोहळे, सुभाष शेळके, विष्णू निकम, राजाभाऊ कुकडे, राजेंद्र कराळे, प्रफुल्ल सांबारतोडे, अमोल चोबीतकर आदी उपस्थित होते. या नामांकनामुळे वरुड-मोर्शीतील संत्र्याला राजाश्रय मिळणार असल्याची भावना आहे.