लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्याच्या मागणीचा संघर्ष ११५ वर्ष जुना आहे. आजपर्यंत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने विदर्भाच्या मागणीला बगल देऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याला प्राधान्य दिले. परंतु यापुढे वेगळ्या विदर्भासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विविध विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी आज येथे केले.विदर्भ निर्माण महामंचच्यावतीने संविधान चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला दिल्लीचे समाज कल्याण मंत्री अॅड राजेंद्र पाल गौतम, विदर्भ राज्य आघाडीचे अॅड श्रीहरी अणे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अॅड सुरेश माने, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, जनमंचचे मुकेश समर्थ, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे उपस्थित होते. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे म्हणाले, विदर्भात बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे. परंतु त्यांना रोजगार देण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने पुढाकार घेतला नाही. वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको करून राज्याचे व्यवहार थांबविण्याची गरज आहे. विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक राम नेवले म्हणाले, विदर्भ निर्माण महामंचतर्फे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी गावागावात जाऊन लढा देऊ. भाजपाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असून निवडणुकीला आंदोलन समजुन लढण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे यांनी विदर्भाच्या विरोधकांना मतदान न करता विदर्भाच्या मागणीवर निवडणुका लढविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अॅड. सुरेश माने म्हणाले, आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विदर्भाच्या मुद्याचे राजकारण केले. पहिल्यांदा विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा झालेला निर्णय झाला ही वेगळ्या विदर्भासाठी चांगले संकेत आहेत. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, मोदी सरकारने देशाला फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशाला वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून हटवून शेतकरी, शेतमजुरांचे सरकार स्थापन करण्याची गरज आहे. संचालन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वानखेडे यांनी केले. सभेला विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केजरीवालांसारखी इच्छाशक्ती हवी : राजेंद्र पाल गौतमदिल्लीचे समाज कल्याण मंत्री अॅड. राजेंद्र पाल गौतम म्हणाले, देशातील जंगल, खाण, जमिनीवर ९० टक्के नागरिकांचा अधिकार नाही. भाजपा, कॉंग्रेसने विदर्भाच्या मागणीवर भूलथापा देऊन मते घेतली. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नसून त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यास कॉंग्रेस, भाजपा जबाबदार आहे. केजरीवाल सरकारने विजेचे दर स्वस्त केले. शासकीय शाळांचा दर्जा सुधारला. या बाबी इतर राज्यात का होत नाहीत? समर्पण भावाने आंदोलन करून विदर्भ वेगळा करण्याचे आवाहन केले.सत्ता हस्तगत करून विदर्भ मिळवा : चटपवामनराव चटप म्हणाले, वेगळा विदर्भ ही स्वातंत्र्याची लढाई आहे. ११५ वर्षापासून फसवणूक करणाऱ्या नेत्यांना मतपेटीतून टक्कर देण्याची गरज आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सर्वांनी विदर्भ निर्माण महामंचच्या उमेदवारांना निवडुन द्यावे. रास्ता रोको, आंदोलन करण्याऐवजी सत्ता हस्तगत करून वेगळा विदर्भ पदरात पाडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.विदर्भवाद्यांनी निवडणुकीत उतरण्याची गरज : श्रीहरी अणेअॅड श्रीहरी अणे म्हणाले, आम्ही कुणाला हरविण्यासाठी किंवा जिंकविण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच तयार केला नसून स्वत:ला जिंकविण्यासाठी केला आहे. आजपर्यंत इतरांवर विश्वास ठेऊन पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे विदर्भ राज्य हवे असेल तर सत्तेला हात घालण्याची गरज असून निवडणुक हा एकमेव पर्याय आहे.