लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी संविधान चौकात नाग सापाचा वेष धारण केलेल्या मुलींना पाहून वाहतूकदार आश्चर्यात पडले होते. या नागवेषातील मुली येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होत्या. त्यांच्या वेषाप्रमाणे त्यांच्या हातात असलेले फलकही अंतर्मूख करणारे होते. ‘नाग किंवा इतर कुठलेही साप हे माणसांचे शत्रु नसून मित्र आहेत, त्यांना मारू नका, त्यांचे संरक्षण करा’ हा संदेश त्यांच्या हातातील फलकावर होता. पीपल्स फॉर ईथीकल ट्रिटमेंट आॅफ अनिमल (पीटा) इंडियातर्फे राबविलेले हे जनजागृती अभियान सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले.पीटा इंडियाच्या राधिका सूर्यवंशी आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागपूरच्या कार्यकर्त्या करिश्मा गिलानी यांच्या नेतृत्वात सोमवारी संविधान चौक येथे हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. हिंदूस्थान विद्यालय, वर्धमाननगरच्या ममता शाहू व लक्ष्मी शाहू या नागवेषधारी विद्यार्थिनींनी वाहनचालक, वाटसरू आणि बसमध्ये बसलेल्या सर्वांचे लक्ष वेधले. यात स्वयंसेवक म्हणून उत्कर्षा पाटील व साक्षी तांबे यांनी सहकार्य केले.राधिका सूर्यवंशी यांनी सांगितले, नाग सर्प स्तनधारी प्राणी नाही. तो अंड्यातून निघाणारा प्राणी असून हे प्राणी कधीही दूध पीत नाही. उलट दूध पिल्याने त्याच्या आंतरीक अवयवांना नुकसान पोहचून मृत्यु ओढवू शकतो. मात्र धार्मिक कारणाने नाग दूध पितो असा निव्वळ भ्रम पसरविला गेल्याचे त्यांनी सांगितले. कधी मनोरंजनासाठी तर कधी धार्मिक कारणाने नागपंचमीच्या दिवशी लोकांना भ्रमिष्ट करण्यासाठी नाग सर्पाला पकडले जाते, त्यांचा फणा काढला जातो. ही सापावर होणारी हिंसा थांबयला हवी. त्यामुळे नागपंचमीला नागाला दूध पाजू नका आणि इतर कोणत्याही दिवशी सापांना मारू नका, हा संदेश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.