हिंगणघाट पीडितेला लवकर न्याय द्या : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 09:22 PM2020-02-10T21:22:19+5:302020-02-10T21:23:27+5:30
हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी व यासाठी हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी ‘अभाविप’तर्फे करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महाराजबाग चौकात निदर्शने केली.
मृत प्राध्यापिकेला न्याय मिळावा व दोषी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. जिजाऊंच्या भूमीत एका महिलेवर झालेला अन्याय ही दुर्दैवी बाब आहे, अशी भावना अभाविपच्या विदर्भ प्रांत विद्यार्थिनी प्रमुख विजया चिखलकर यांनी व्यक्त केली. तर लवकरात लवकर पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगर मंत्री अमित पटले यांनी दिला.