महाराष्ट्र दिनापूर्वी मराठीला द्या अभिजात भाषेचा दर्जा अन्यथा..; साहित्यिकांचा इशारा
By निशांत वानखेडे | Published: April 19, 2023 02:47 PM2023-04-19T14:47:26+5:302023-04-19T14:48:44+5:30
साहित्यिकांची सामूहिक चळवळ
नागपूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पून्हा एकदा साहित्य क्षेत्राकडून व्यापक माेहीम राबविली आहे. येत्या १ मे राेजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वी मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा इशारा महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून दिला जात आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने टाळाटाळ चालविली आहे. या पार्श्वभूमीवर अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या 'मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समिती ' द्वारे आणि महेश केळुसकर यांनी पुढाकार घेऊन केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना जे पत्र नुकतेच पाठवले आहे. याला पाठींबा देत ‘मराठीच्या व्यापक हितासाठी’ राज्यातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार यांनी व्यापक माेहीम राबविली आहे. ३० एप्रिल राेजी मागणी पूर्ण करा, अन्यथा १ मे राेजी काळ्या फिती लावून सार्वजनिकरित्या निषेध करण्याचा इशारा यात दिला असून समग्र मराठी भाषिक समाजाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गज्वी आणि केळुसकर यांनी पुढाकार घेतलेल्या या मोहीमेमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी, रंगनाथ पठारे (अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती), रामदास फुटाणे (अध्यक्ष, जागतिक मराठी अकादमी) वसंत आबाजी डहाके (पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ), लक्ष्मीकांत देशमुख (पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ.रामदास भटकळ ( लेखक-प्रकाशक), कौतिकराव ठाले-पाटील (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद), रवींद्र शोभणे (कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ), कपूर वासनिक (अध्यक्ष, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद), वामन पंडित (वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग), डॉ.प्रदीप कर्णिक (मराठी संशोधन मंडळ), भिकू बारस्कर, (अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, कल्याण), रजनीश राणे (संस्थापक, मराठी आठव दिवस), डॉ.हरिश्चंद्र बोरकर (संस्थापक, झाडी बोली साहित्य मंडळ), डाॅ. यशवंत मनोहर, दादा गोरे, बाबा भांड, रोहिणी हट्टंगडी, किशोर कदम 'सौमित्र', अरुणा सबाने, सुनील कर्णिक, डॉ.अनुपमा उजगरे, ज्ञानेश महाराव, सुषमा देशपांडे, प्रतिमा जोशी, दिपक राजाध्यक्ष, राकेश सारंग, विजय केंकरे, राजीव जोशी, गिरीश पत्के, डॉ.सुरेश मेश्राम, युवराज मोहिते, सुनील महाजन, अरुण घाडीगांवकर, रवींद्र पाथरे, भालचंद्र कुबल, ताराचंद्र खांडेकर, प्रतिभा सराफ, प्रशांत वांद्रे, जनार्दन लवंगारे, विजय तारी, अविनाश गायकवाड, डॉ. महेंद्र भवरे, डॉ.अनिल सपकाळ, राकेश शिर्के, राजू तुलालवार, श्रीकृष्ण काकडे, डॉ.अनिल बांदिवडेकर, सतीश नाईक, डॉ. सतीश पावडे, डॉ.निशा शेंडे, डॉ.आशा मुंढे, भगवान हिरे, अजय कांडर, प्रा.अनिल सोनार, मंगेश विश्वासराव या मान्यवरांनी सहभाग नोंदवला असून सर्वच लेखक, कलावंत, पत्रकार, चित्रकार, व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर ,वकील आदींनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.