नागपूर : संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या शेगाव नगरीतील आकाश मार्ग (स्काय वॉक), उनाड नाला आणि दोन रस्ते तीन दिवसात गजानन महाराज संस्थानच्या ताब्यात द्या, असे आदेश नागपूर खंडपीठाने गुरुवारी अमरावती विभागीय आयुक्तांना दिलेत. याप्रकरणी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. स्कॉय वॉक आणि त्याखालील उनाड नाला तसेच दोन रस्ते हे संस्थानला देखभाल , सौंदर्यीकरण व वापरण्याकरिता तीन दिवसात देण्यात यावे , असे आदेश हायकोर्टाने विभागीय आयुक्तांना दिलेत. तसेच राज्य शासनाने यासंदर्भातील करार २४ ऑगस्ट २0२0 रोजी केला आहे. आणि दिलेल्या अंतिम प्रारूपानुसार तीन आठवड्यांत मंजुरी देऊन त्याप्रमाणे करार करावा, असे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान असामाजिक तत्वांपासून संरक्षण करण्याकरिता दोन रस्ते संस्थानच्या ताब्यात देणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात हायकोर्टाने नोंद घेतली आहे. स्काय वॉकचे बांधकाम पूर्ण झाले असून देखभालीकरिता तो गजानन महाराज संस्थानने घ्यावा, असा प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांनी ठेवला होता. दरम्यान, शेगावात महाराजांच्या दर्शनाकरिता लाखो भाविक येतात. त्यामुळे या शेगावनगरीचा विकास व्हावा, यासाठी आनंदीलाल भुतडा आणि सुरेश जयपुरी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
शेगावातील स्काय वॉक गजानन महाराज संस्थानला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:10 AM