वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी जीएमआरने लावलेली अंतिम बोली रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने टेंडरची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याकरिता एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इप्लिमेंट कमिटीच्या (पीएमआयसी) बैठकीत या बोलीवर विचार करण्यात आला. विमानतळाच्या खासगीकरणात महसुलाची भागीदारी २० टक्के होऊ शकते, असा सूर व्यक्त करण्यात आला. त्यामुळे जीएमआरची बोली रद्द करण्यात आली.पाटील म्हणाले, नागपूर विमानतळाचे संचालन नफ्यात आहे. याशिवाय नागपूरचा विस्तार आणि विकास निरंतर होत आहे. अंतिम बोली ५.७६ टक्के होती. पण लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर एमएडीसीसोबत बातचित करण्यात आली. त्यानंतर महसूल भागीदारीची टक्केवारी १४.४९ टक्के करण्यात आली. आता यापेक्षा जास्त महसूल मिळू शकतो, हे यावरून स्पष्ट होते. शिवणगांवात ७० स्ट्रक्चरचे अधिग्रहण बाकी आहे. हे काम लॉकडाऊननंतर पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रति प्रवासी रेव्हेन्यू शेअरिंगचे मॉडेलपूर्वी जीएमआरकडून अंतिम बोली आली तेव्हा विमानतळाच्या खासगीकरणासाठी महसुलाच्या भागीदाराचे मॉडेल हे एकूण महसुलामध्ये भागीदारीचे होते. यापूर्वी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मंगळुरू, त्रिवेंद्रमसह देशातील सहा विमानतळाचे खासगीकरण करण्यात आले तेव्हा प्रति प्रवासी महसुलाची भागीदारी निश्चित करण्यात आली. आता नागपूर विमानतळाच्या खासगीकरणात भागीदारीसाठी याच मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. खासगीकरणाच्या मास्टर प्लॅनमध्ये याशिवाय कोणताही मोठा बदल होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.