बकरीच्या दुधाचा आणि कोळशाचा साबण अन् मोहफुलाचे लाडू..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 09:13 PM2022-06-04T21:13:09+5:302022-06-04T21:16:05+5:30
Nagpur News नागपुरात भरलेल्या सरस या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी विभिन्न उत्पादित वस्तू ठेवल्या असून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर : तुम्ही बकरीच्या दुधाच्या साबणाने कधी अंघोळ केली आहे का, गोमूत्राच्या साबणाने त्वचा शुद्ध केली आहे का, कोळशाच्या साबणारे गाल गुळगुळीत केले आहेत का? नक्कीच केले नसतील. जगलातील मोहफुलापासून तयार केलेले पौष्टिक लाडू तर नक्कीच चाखले नसतील. मात्र, हे सर्व प्रयोग ग्रामीण भागातील महिलानी साकारले असून ते तुमच्यापर्यंत त्या घेऊनही आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला स्वत:चा व्यवसाय उभारून आर्थिक संपन्न होण्याची नुसतीच स्वप्न पाहत नसून ती वास्तवात उतरविण्यासाठी कशी धडपड करीत आहेत, याची प्रचिती मानकापूर क्रीडासंकुलात सुरू असलेल्या विभागस्तरीय सरस महोत्सव व जिल्हा महिला मेळाव्यात येत आहे.
भंडाऱ्यापासून ५५ किमी अंतरावरील डोंगरतला गावातील ११ महिलांनी तीन वर्षांपासून एकत्र येत बचत गट सुरू केला. सुरुवातीची दोन वर्षे पारंपरिक वस्तूंची विक्री केली. काहीतरी नवे करण्याच्या विचारात असतानाच बचत गटाच्या प्रमुख शीतल ठवकर यांना बकरीच्या दुधापासून साबण तयार करण्याचे मार्गदर्शन मिळाले. ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा त्यांनी निर्धार केला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व विविध बँकांच्या माध्यमातून चार लाखांचे कर्ज घेतले. साबण तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन व साहित्य खरेदी केले. गेल्या वर्षभरापासून डोंगरतला गावातच बकरीच्या दुधापासून, कोळशापासून, कडुनिंबाच्या पानांपासून साबण तयार केले जात आहे. सुरुवातीला दुकानदार हे साबण विक्रीसाठी ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे या महिला पदर खोचून मार्केटिंगसाठीही बाहेर पडल्या. विविध प्रदर्शन, मेळावे, शिबिरात विक्री करू लागल्या. लोकांना गुणवत्ता आवडली. आज त्यांच्या या साबणांना विक्रीचा फेस चढला आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे साबण जसे नावाने मागितले जाते. तसेच एक दिवस आम्ही कष्टाने तयार केलेले साबण लोक नाव घेऊन मागतील, असा आत्मविश्वास या महिलांना आहे.
गडचिरोलीच्या जंगलातील मोहफुलात लाडवाचा गोडवा
- गडचिरोलीपासून ४५ किमी अंतरावर चातगाव नावाचे छोटेसे गाव. गावालगतच्या जंगलातून वेचून आणणाऱ्या मोहफुलाचे पौष्टिक लाडू देशभरातील घराघरात पोहचविण्याचे मोठं स्वप्न या भागातील दहावी-बारावी शिकलेल्या महिलांनी पाहिलं आहे. जंगल भागात मोहफुले मोठ्या प्रमाणात मिळतात. आदिवासी भागात जुने लोक मोहफूल वाळवून बारीक करायचे. त्यात तीळ, गुळाचा पाक टाकून पौष्टिक लाडू तयार करायचे. हे लाडू लहान मुले व गरोदर मातांसाठी खूप उपयोगी असतात.
आपण हेच लाडू तयार करून ते शहरातील बाजारपेठेत विकले तर एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो, अशी संकल्पना १२ वीपर्यंत शिकलेल्या संगीता दुधाने यांना काही दिवसांपूर्वी सुचली. माँ दंतेश्वरी बचत गटाच्या महिलांना सोबत घेत त्यांनी जंगलातून मोहफूल गोळा केले. अशातच नागपुरात सरस महोत्सव व जिल्हा महिला मेळावा आयोजित होत असल्याची माहिती त्यांना मिळाली व याच मेळाव्यात आपण मोहफुलाच्या लाडूविक्रीचा शुभारंभ करण्याचा निर्धार केला. प्रदर्शनात पहिल्याच दिवशी चांगली विक्री तर झालीच पण चौफेर कौतुकाची थाप मिळाली. तुम्ही शहरी लोक मेव्याचे लाडू खाता. आता या जंगली मेव्याचे लाडू आम्हाला घराघरात पोहचवायचे, असे संगीता दुधाने आत्मविश्वासाने म्हणाल्या.