लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सर्वाधिक ७४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. यापूर्वी ८ एप्रिल २०२१ रोजी ७३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या या संख्येमुळे नागपूरकरांसह प्रशासन व आरोग्य विभाग चिंतेत पडले आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५८१३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ४६३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३४१६, ग्रामीण भागातील १२१८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २,३२,७०५ रुग्ण बरे झालेले आहे. रिकव्हरी रेट ७७.६० टक्के नोंदवण्यात आला आहे.
नागपुरात आतापर्यंत एकूण ३,०२,८४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर ६०३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३४५८, ग्रामीणमधील २३५० आणि जिल्ह्याबाहेरचे ५ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३९, ग्रामीणचे ३० आणि जिल्ह्याबाहेरचे ५ जण आहेत. आतापर्यंत शहरात २,२७,३७४, ग्रामीणमध्ये ७४,३५८ आणि जिल्ह्याबाहेरचे १११७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मृतांमध्ये आतापर्यंत शहरातील ३७५१, ग्रामीणचे १३४८ आणि जिल्ह्याबाहेरचे ९३५ जण आहेत.
नागपूर जिल्ह्यातील एकूण २२,५७५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १५,१७३, ग्रामीणचे ७४०२ आहेत. गुरुवारी १२,९३८ आरटीपीसीआर आणि ९६३७ अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. खासगी प्रयोगशाळेत १०,२७९ नमुन्यांपैकी २५१२ नमुने आणि अँटिजेन टेस्टमध्ये २४९८ नमुने पॉझिटिव्ह आलेत.
चौकट
५०,४३८ जण होम आयसोलेशन
नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६४,११० वर पोहोचली आहे. यापैकी शहरातील ३९,३९०, ग्रामीणमध्ये २४,७२० जण आहेत. यापैकी ५०,४३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये १३,६७२ रुग्ण उपाचार घेत आहेत.
ॲक्टिव्ह - ६४,११०
बरे झालेले- २,३२,७०५
मृत- ६०३४