कळमेश्वरहून झुनकीला जाताय? सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:24+5:302021-07-19T04:07:24+5:30
पावसामुळे रस्त्याला डबक्यांचे स्वरूप : मार्गक्रमण करताना करावी लागते कसरत आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : कळमेश्वरहून झुनकीपर्यंतचा ...
पावसामुळे रस्त्याला डबक्यांचे स्वरूप : मार्गक्रमण करताना करावी लागते कसरत
आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वरहून झुनकीपर्यंतचा तीन किमीचा प्रवास दिव्यच म्हणावा लागेल. या राेडवर विखुरलेली गिट्टी तीन भागात विभागली असून, त्या गिट्टीमधून तयार झालेल्या पाऊलवाटेने वाहने चालवावी लागतात. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने खड्डे व उंच-सखल भागामुळे या रस्त्याचा डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खड्ड्यांमधून वाहने उसळत असल्याने एकीकडे वाहनांचे नुकसान हाेत असून, दुसरीकडे पाठ व मानेचा त्रास वाढत आहे. प्रसंगी वाहन स्लीप हाेऊन काेसळल्यास गंभीर दुखापतही सहन करावी लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
कळमेश्वर-झुनकी (सिंधी) या मार्गालगत कळमेश्वर शहरातील अनेकांची शेती असून, झुनकी (सिंधी) येथील नागरिकांना कळमेश्वर शहरात येण्यासाठी तसेच शेतीची वहिवाट करण्यासाठी या मार्गाला पर्यायी मार्ग नाही. या राेडवर विखुरलेली गिट्टी, खड्डे, त्यात साचलेले पाणी यामुळे या मार्गावरील प्रवास तीन वर्षापासून अत्यंत धाेकादायक झाला आहे.
....
झुनकी (सिंधी) मार्ग
राज्य शासनाने कळमेश्वर-झुनकी (सिंधी) मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गत ३७३.४४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. १९ जुलै २०१९ पासून या मार्गाच्या दुरुस्तीला रीतसर सुरुवात करण्यात आली. कंत्राटदाराला संपूर्ण काम १८ महिन्यात म्हणजे १८ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करावयाचे हाेते.
..
तीन किमी-तीन वर्षे
या काळात कंत्राटदाराने राेडवर गिट्टी व मुरुम टाकण्याशिवाय काेणतेही काम केले नाही. तीन किमी अंतराच्या राेडच्या दुरुस्तीला अर्थात खडीकरण व डांबरीकरणाला तीन वर्षाचा काळ खरंच लागताे काय? वास्तवात, या राेडवरून पायी चालणे अवघड झाले असून, वाहनांच्या चाकांमुळे गिट्टी उडत असल्याने धाेकादायक आहे.
...
दिरंगाई का?
या मार्गाच्या दुरुस्तीला दिरंगाई का केली जात आहे, याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक याेजना व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी काहीही बाेलायला तयार नाही. कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. वास्तवात, ते कामही दाेन दिवसानंतर बंद करण्यात आले.
...
या रस्त्यावर गाडी चालवणे धोकादायक आहे. वाहने खड्ड्यातून उसळत असल्याने कमी वयात पाठ व कंबरदुखीचा त्रास जाणवायला लागला आहे.
- परेश राऊत, वाहनचानलक.
...
राेडवरील गिट्टीमुळे दुचाकी वाहने स्लीप हाेतात. गिट्टीवर पडल्याने गंभीर दुखापतही हाेते. खड्ड्यांमुळे पाठदुखीचा सुरू झाली. वाहनाचे नुकसान हाेते.
- जगदीश राऊत, वाहनचालक.
...
खड्ड्यांमुळे मणक्यांचा त्रास
दुचाकी व चारचाकी वाहने खड्ड्यातून गेल्यास उसळतात आणि वाहनातील व्यक्तींना धक्के लागतात. वारंवार लागणाऱ्या या धक्क्यांमुळे वाहनचालकांसह इतरांना मणक्याचा त्रास जाणवताे. यातून मान, पाठ व कंबरदुखी वाढते. पुढे हे दुखणं गंभीर रूप धारण करू शकते.
- डाॅ. भास्कर सेंबेकर.
...