वाळू तस्करीवरून गुलाबरावांचा खडसेंवर हल्लाबोल
By admin | Published: December 10, 2015 03:06 AM2015-12-10T03:06:07+5:302015-12-10T03:06:07+5:30
जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल करीत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.
सागर चौधरी, मिश्रांना पाठीशी कोण घालतो? :
खडसे यांची चौकशीची घोषणा
नागपूर : जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल करीत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.
सागर चौधरी हा जळगावमधील पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्या प्रकरणात आरोपी आहे. त्याचा बचाव का केला जात आहे, त्याचे कुणाशी संबंध आहेत, अशी विचारणा पाटील यांनी राज्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडताना केली. वाळू माफियांमधील गुंड प्रवृत्तींमुळे लुटमार, खून, या प्रकारात वाढ होत असून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
जळगावमध्ये राजेश मिश्रा याच्याकडून महसूल विभागाला १५ कोटी रुपये घेणे आहेत. एवढी थकबाकी असताना त्यांना काळ्या यादीत का टाकले नाही, असा सवाल पाटील यांनी केला. एवढी थकबाकी असताना मिश्रालाच पुन:पुन्हा ठेके दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सागर चौधरीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर, महसूल मंत्री खडसे यांनी मिश्रावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की कुणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नाही. नव्या कायद्यानुसार वाळू तस्करांची संपत्ती, वाहने जप्त करणे,त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. चौकशीत दोषी आढळलेल्यांविरुद्ध ही कारवाई केली जाईल.
पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली तेव्हा सभागृहात कर्जमाफीच्या मागणीवरून गदारोळ सुरू होता.
या गदारोळातच ही लक्षवेधी झाली. अवैध वाळू उपसा न होण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती खडसे यांनी लेखी उत्तरात दिली. (विशेष प्रतिनिधी)