रामटेक : शासनाच्या हमीभावाच्या धान खरेदी केंद्रावर पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी केलेला धान विक्रीसाठी येत असल्याचे उघड झाले आहे. चाचेर येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याचा निम्नप्रतिचा धान विक्रीसाठी आल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली होती. याबाबत आ. आशिष जयस्वाल यांनी संबंधित केंद्रावर पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विक्रीसाठी येणारा धान खरंच सदर शेतकऱ्याच्या शेतातीलच आहे का, त्या शेतकऱ्याने सातबारावर नोंदविलेल्या धानाचीच लावण केली होती का? याची शहानिशा पटवारी यांच्यामार्फत होणे आवश्यक आहे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. रामटेक, मौदा तालुका हा धानपट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. सध्या शासनाने शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. प्रति क्विंटल १८६८ रुपये असा हमीभाव व ७०० रुपये बोनस दिला जात आहे. एकरी १३ क्विंटलप्रमाणे धान शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर देता येतो. धान विक्री करताना शेतकऱ्यांना केंद्रावर धान कधी आणावा, यासाठी टोकन देण्यात येते. अलीकडेच सुरू झालेल्या या धान खरेदी केंद्रांवर शेतकरी धान विक्रीसाठी आणत आहे. परंतु शेतकऱ्यांकडून कमी किमतीत खरेदी केलेल्या धानावर मिळणाऱ्या बोनसवर डल्ला मारण्यासाठी धान खरेदी करणारे दलाल व व्यापारी नेहमीच टपून असतात. शेतकऱ्यांच्या सातबारावर हे व्यापारी त्यांनी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत खरेदी केलेला धान विक्रीसाठी आणून घोटाळा करतात. मौदा तालुक्यातील चाचेर येथील सोना राईस मिल्सवर असलेल्या धान खरेदी केंद्रावर गुरुवारी एका शेतकऱ्याला धानाचा ट्रक दिसला. त्यातील अर्धा धान खाली झालेला तर अर्धा गाडीतच होता. या धानाला दुर्गंधी येत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते. त्याने हा धान कुणाचा आहे असे दुसऱ्या एका शेतकऱ्याला विचारले असता, हा व्यापाऱ्याचा धान असल्याचे सांगितले. सदर शेतकरी यामुळे चिडला व ट्रकचा फोटो काढू लागला असता तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला फोटो काढण्यास मज्जाव केला. सदर अवैध धान खरेदीची माहिती जयस्वाल यांना देण्यात आली असता ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व्यवस्थापकाला याबाबत विचारणा केली. धान घेऊन आलेल्या व्यक्तीला हा धान तुमच्या शेतातला आहे का? असा सवाल केला असता त्याने तो शेजारच्या राज्यातून खरेदी केल्याचे सांगितले. सदर धान जप्त करून त्याचा पंचनामा करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले.
धान खरेदी केंद्रावर गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:27 AM