नागपूर : आपल्या गावात, आपल्या नातेवाईकांत, मित्रमंडळीत जाऊन होळी धुळवडीचा आनंद घेण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांना मध्य रेल्वेकडून एक खुष खबर आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी विविध मार्गावर होळी स्पेशल ११२ ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. आता त्यात आणखी १२ स्पेशल ट्रेनची भर घातली आहे. यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. शुक्रवारी या संबंधाने मध्य रेल्वेने तशी अधिकृत घोषणा केली आहे.
विविध सणोत्सवाचा आनंद आपल्या गावात जाऊन नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत घेण्याची योजना अनेक जण तयार करतात. मात्र, गाव दूर आणि रेल्वेत प्रचंड गर्दी असल्यामुळे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाते अन् त्यांची गावात जाऊन सणोत्सव साजरा करण्याची ईच्छा तशीच राहते. ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी होळीच्या सणानिमित्त ११२ रेल्वे स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय जाहिर केला होता. या गाड्यांचे तिकिट आरक्षित करण्यासाठी प्रवाशी मोठ्या संख्येत गर्दी करीत असल्याचे लक्षात आल्याने मध्य रेल्वेने आणखी १२ होळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या १२ स्पेशल ट्रेनपैकी ४ गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. अर्थात या दोन रेल्वे स्थानकावरून त्या प्रवाशांची चढ उतार करणार आहेत.
नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबणाऱ्या स्पेशल ट्रेन ०५३०३ गोरखपूर- महबूबनगर ही गाडी रविवार, २४ मार्चला सकाळी ६.४० वाजता नागपूर स्थानकावर थांबेल. त्यानंतर ती सकाळी १० वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहचेल.
०५०५१ छपरा- सिकंदराबाद ही गाडी रविवार ३१ मार्चला सकाळी ६.४० वाजता नागपूर स्थानकावर आणि नंतर सकाळी १० वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहचेल.
०५३०४ महबूबनगर - गोरखपूर मंगळवार, २६ मार्चला पहाटे ३.१५ वाजता बल्लारशाह येथे तर सकाळी ६.३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. ०५०५२ सिकंदराबाद - छपरा ही विशेष गाडी मंगळवार २ एप्रिलला पहाटे ३.१५ ला बल्लारशाह येथे आणि सकाळी ०६.३० वाजता नागपूर स्थानकावर येईल.