लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लावणी म्हटले की मुली किंवा महिलांशिवाय कुणी करू शकत नाही, हा बहुतेकांचा गैरसमज. त्या नजाकती, ते हावभाव, तसे पदलालित्य स्त्रीशिवाय कुणाला जमेल बरे? मग एखाद्या मुलाने त्या नजाकतींसह लावणीवर दिलखेचक नृत्य केले तर? तर त्याची टर उडविली जाईल, टिंगलटवाळी केली जाईल. दुर्दैवाने हे सर्व त्याच्याही वाट्याला आले. तो मात्र ढळला नाही की ओशाळला नाही. तो लावणीवर निस्सीम प्रेम करणारा, लावणी जगणारा. मग ही अवहेलना पायात घुंगराला बांधून तो असा भन्नाट नाचला की प्रत्येक स्टेज त्याने पदलालित्याने गाजविले. होय, लावणी नृत्यात भल्याभल्यांना दंग करणारा ‘तो’ म्हणजे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या छोट्याशा गावचा स्वप्निल विधाते. हा पाटलाचा पोरगा आणि वरून वडील नावाजलेले पहेलवान. मुलाने पहेलवान व्हावे किंवा शिक्षण घेऊन नोकरी करावी, ही सर्वसामान्य पित्याप्रमाणे त्यांचीही अपेक्षा. पण स्वप्निलच्या मनात वेगळेच काही होते. समजायला लागल्यापासून त्याची नृत्याकडे ओढ होती व लावणीने झपाटले होते. त्याच्या पायातही नृत्याचा नाद होता. वय वाढले तसे हे कलाप्रेम अधिकच वाढले आणि लावणीच त्याचा जीव की प्राण झाले. या लावणी प्रकारात वेगळे काहीतरी करावे, आपलाही ठसा उमटवावा, हे स्वप्निलचे ध्येय. या ध्येयातून वेगवेगळ्या मंचावर सादरीकरण करू लागला आणि येथूनच त्याचा सामाजिक मनोवृत्तीशी संघर्ष सुरू झाला. मुलींनाही लाजवेल अशा दिलखेचक अदा व पदलालित्याने नृत्य करतो की महिलाही आश्चर्यचकित होतात. पण यासोबत मनोवृत्तीची हेटाळणी त्याच्या वाट्याला आली. तसा बायकी नृत्य करतो म्हणून कठोर असा विरोध घरूनच सुरू झाला. त्याचे नृत्य इतरांनाही रुचत नव्हते. कुणी त्याला नाच्या म्हणून टर उडवू लागले तर कुणी किन्नर म्हणून हिणवू लागले.तसा लावणी हा महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्यप्रकार. मराठी कलाप्रकार म्हणून लावणी अभिमानाने मिरवलीही जाते. पण नाचायला महिलाच पहिजे, ही मनोवृत्ती असताना या नृत्याला कलाप्रकार म्हणून बघायचे की पुरुषी मानसिकता, हा प्रश्न त्यालाही पडतो. पण टोकाची अवहेलना होऊनही त्याने मात्र नृत्यावरील प्रेम सोडले नाही, उलट त्याचे मन अधिक मजबूत झाले. त्याने गाव सोडले.लोक तिकीट घेउन पाहू लागले शोवेगवेगळ्या शहरात तो आपले नृत्य सादर करू लागला व लोकही त्याच्या कलेच्या प्रेमात पडू लागले. त्याचे नृत्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याच्या नृत्याने कार्यक्रम गाजू लागले. दिसायला सुंदर व सडपातळ बांध्याचा स्वप्निल लोकांच्या नजरेत भरला. हिणावणारे लोक आता तिकीट काढून त्याचे शो पाहू लागले. तो टीव्हीवरील रिअलिटी शोमध्ये पोहचला व हे स्टेजही त्याने आपल्या नृत्यकौशल्याने गाजविले. मराठी सेलिब्रिटींकडून त्याचे कौतुकही झाले आणि तो थेट चित्रपटसृष्टीत पोहचला. ‘नकुसा’ व ‘टाळी’ या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला असून पुन्हा तीन हिंदी चित्रपटातही त्याला संधी मिळाली आहे. यादरम्यान महाराष्ट्र शासनाने पुरस्कारही देउन त्याचा गौरव केला. त्याच्यातील कलागुण आता कुटुंबालाही समजू लागले व त्यांनीही त्याचा स्वीकार केला.संघर्ष अजून बाकीअलका कुबल, वैदर्भीय भारत गणेशपुरे, भजनगायक अनुप जलोटा, माधुरी पवार अशा कलावंतांनी त्याच्या कलेचे कौतुक केले. लोकप्रियता व पुरस्कार मिळू लागले, पण संघर्ष अद्याप संपला नाही. प्रमाण बरेच कमी झाले तरी टिंगलटवाळी आजही होते. पण या नृत्यकलेत स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न त्याने व्यक्त केले.
त्याच्या लावणीने सरकार जाहले दंग : अवहेलनेची वेदना घुंगराला बांधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:57 AM
लावणी म्हटले की मुली किंवा महिलांशिवाय कुणी करू शकत नाही, हा बहुतेकांचा गैरसमज. त्या नजाकती, ते हावभाव, तसे पदलालित्य स्त्रीशिवाय कुणाला जमेल बरे? मग एखाद्या मुलाने त्या नजाकतींसह लावणीवर दिलखेचक नृत्य केले तर? तर त्याची टर उडविली जाईल, टिंगलटवाळी केली जाईल. दुर्दैवाने हे सर्व त्याच्याही वाट्याला आले. तो मात्र ढळला नाही की ओशाळला नाही. तो लावणीवर निस्सीम प्रेम करणारा, लावणी जगणारा. मग ही अवहेलना पायात घुंगराला बांधून तो असा भन्नाट नाचला की प्रत्येक स्टेज त्याने पदलालित्याने गाजविले.
ठळक मुद्देलावणी जगणाऱ्या स्वप्निलचा संघर्षमय प्रवास